क्राईम डायरीमुख्य बातम्या

वाकूडमधील सशस्‍त्र हाणामारी : मुख्य आरोपी राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष अजूनही पोलिसांना सापडेना!; चौघांना अटक; हल्ल्यातील गंभीर जखमीची मृत्यूशी झुंज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वाकूड (ता. खामगाव) येथे ८ एप्रिलला झालेल्या सशस्‍त्र हाणामारी प्रकरणातील चार संशयितांना पिंपळगाव राजा पोलिसांनी काल, २१ जूनला मोठ्या शिताफीने अटक केली. हाणामारीच्‍या दिवसांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते. वसंता विश्वासराव लाहुडकार (५५), सुधाकर भास्कर लाहुडकार (३३), मंगेश भास्कर लाहुडकार (३५), तेजराव शिवाजी अढाव (३५, सर्व रा. वाकूड, ता. खामगाव) अशी त्‍यांची नावे आहेत. प्रकरणातील मुख्य संशयित राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष भरत लाहुडकार अजूनही पोलिसांच्‍या हाती लागलेला नाही हे विशेष. यापूर्वीच अटक केलेला संशयित अनिल वसंता लाहुडकर (२८) याला जामीन मिळाला असून, काल अटक केलेल्या चाैघांनाही खामगाव न्यायालयात हजर केले असता २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

…त्यांची अजूनही मृत्यूशी झुंज सुरूच
८ एप्रिलला वाकूड (ता. खामगाव) येथे भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी मोजणीसाठी उपस्थित होते. त्यावेळी सरकारी रस्त्याला सिमेंट पोल व तारकंपाउंड करून रस्ता अडवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भरत लाहुडकर याने माजी सरपंच सोपान लाहुडकर यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला होता. यात तलवार, कुऱ्हाड, लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला. हल्ल्यात सोपान लाहुडकर यांच्या परिवारातील सहा जण गंभीर जखमी झाले होते. यातील तिघांना अकोला तर तिघांना खामगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. जखमींपैकी ५ जण बरे झाले आहेत; परंतु गजानन वासुदेव लाहुडकर (४९) यांना तलवारीचे गंभीर घाव बसल्याने ते घटनेच्या दिवसापासून कोमात आहेत. अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, मृत्यूशी झुंज देत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: