खामगाव (घाटाखाली)जिल्ह्याचं राजकारणमुख्य बातम्या

वाढदिवसानिमित्ताने समोर आला संग्रामपूर भाजपा पदाधिकाऱ्यांचा आकस!

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आमदार डॉ. संजय कुटे यांचा वाढदिवस जळगाव जामोदसह शेगाव तालुक्‍यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कोरोनाविषयक सर्व नियम पाळून का होईना उत्‍साहात साजरा केला. यानिमित्त सामाजिक कार्यक्रम राबवले. अपवाद संग्रामपूर तालुक्‍याचा. डॉ. कुटे यांनी मोठे केलेल्या कार्यकर्त्यांना भाऊंचा पडलेला विसर चर्चेचा विषय बनला आहे. तालुकाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना जळगाव जामोदच्‍या कार्यक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केल्याची चर्चा आहे. त्‍यामुळे तालुकाध्यक्षांना आमदारसाहेबांच्‍या वाढदिवसाचे एवढे काय ओझे झाले होते, अशी भावना सामान्य कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे.

आमदार डॉ. कुटे हे जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव तालुक्‍यातील कार्यकर्त्यांच्‍या गळ्यातील जणू ताईतच आहेत. भाऊंसाठी काय पण अन्‌ कुठे पण अशी भावना या सामान्य कार्यकर्त्यांत आहे. नेमकी हीच भावना मात्र काही पदाधिकाऱ्यांना रूचत नसल्याचे वारंवार समोर आले आहे. विशेष म्‍हणजे त्‍यांना पदे आणि एकूण राजकारणातील महत्त्वही डॉ. कुटे यांच्‍यामुळेच मिळत आले आहे. तरीही त्‍यांचा भाऊंबद्दलचा आकस काही केल्या लपत नाही. संग्रामपूर तालुक्‍यात डॉ. कुटे यांच्‍या वाढदिवसाबद्दल साधा छोटा मोठा कार्यक्रम घेण्याचीही तसदीही यामुळेच त्‍यांनी घेतली नाही, अशी चर्चा तालुक्‍यातील कार्यकर्त्यांत होत आहे. दोन जिल्हा परिषद सदस्य, संग्रामपूर पंचायत समिती सभापती तरीही निरुत्‍साह दिसून आला. तालुकाध्यक्षांनी त्यावर कडी केली. चक्क जळगाव जामोद येथे होणाऱ्या कार्यक्रमांत सहभागी होण्यास सांगितलंल, असे एका कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्‍या अटीवर सांगितलं.

भाऊ- भाऊ म्‍हणून पदे मिळवायची अन्‌…

भाऊ-भाऊ म्‍हणून ठेकेदारी, वाळूउपसा अन् इतर २ नंबरचे धंदे करण्यासाठी भाऊंचा पाठीराखा म्हणून वापर करायचा. भाऊंच्या पुढे मागं करून पक्षात पदं मिळवायची. सोबत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिकिट मिळवायचे. एवढ्या पुरतेच भाऊंचे कट्टर समर्थक आहोत, असे भासवायचे असते का, अशी संतप्‍त भावनाही काही कार्यकर्त्यांनी व्‍यक्‍त केली. काल दिवसभर संग्रामपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची भाजपा पदाधिकाऱ्यांवर आगपाखड सुरू होती.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: