बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

वाढीव दराने ‘रेमडेसिवीर’ विकत असल्यास छापे पडणार!; पालकमंत्र्यांचे आदेश

  • कोविड नियंत्रणावर लसीकरण हा प्रभावी उपाय
  • ऑक्सीजन पुरवठा, रेमडेसिवीरची उपलब्धतेचा घेतला आढावा
  • कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसीविर इंजेक्शनचा पुरवठा जिल्ह्यात पुरेसा ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्‍न करण्यात येत आहे. याबाबत कंपन्यांशी चर्चा करून उत्पादनही वाढवायला लावले आहे. त्यामुळे या औषधाचा मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होणार आहे. रेमडेसिवीर उत्‍पादक कंपन्यांशी चर्चा करून या औषधाचे दर नियंत्रणात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातही वाढीव दराने या औषधाची विक्री होत असल्यास छापे मारून तपासण्या कराव्यात, असे आदेश राज्याचे अन्‍न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांनी आज, 6 एप्रिलला दिले.

कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. त्‍यावेळी पालकमंत्री बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, सहायक आयुक्त (औषधे) अशोक बर्डे, औषध निरीक्षक गजानन घिरके आदी उपस्थित होते. रेमडेसिवीर औषधाची एमआरपी कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, की औषधाची एमआरपी कमी करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. त्यानुसार एमआरपी कमी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. कोरोनाची तपासणी बऱ्यापैकी होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. कोविडवर लसीकरण अत्यंत प्रभावी असून, लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाचा वेग बघता लसींचा पुरेसा साठा ठेवावा. त्यानुसार विभागाने नियोजन करावे. स्त्री रुग्णालयात नवीन 100 बेडची व्यवस्था करण्यात यावी. क्षयआरोग्यधाम येथे आयसीयू युनीट तयार करावे. द्रवयुक्त ऑक्सीजनची मागणी नोंदवून परिस्थितीनुरूप द्रवयुक्त ऑक्सीजनचा साठाही पुरेसा करून ठेवावा, असे निर्देशही त्‍यांनी दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी कोविडचा पॉझिटिव्‍हीटी दर, मृत्यू दर, लसीकरणाचे प्रमाण, ऑक्सीजनचा साठा व पुरवठा, रेमडेसिवीरचा साठा व पुरवठा आदींचा आढावा घेतला. यंत्रणांकडून अडचणी जाणून घेतल्या. बैठकीला संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: