क्राईम डायरीमुख्य बातम्या

विकृतांचे कारनामे सुरूच… शेतातील तुरीच्या दोन सुड्या पेटवून 3 लाखांचे नुकसान; टाकरखेड हेलगा येथील शेतकर्‍यावर आर्थिक संकट!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत सुड्या पेटविण्याचे सत्र सुरूच आहे. आरोपींना अटक करण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. आजही, 18 जानेवारीला टाकरखेड हेलगा (ता. चिखली) येथील शेतकर्‍याच्या तुरीच्या दोन सुड्या पेटविण्यात आल्या. यात शेतकर्‍याचे जवळपास 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हे शेत डासाळा येथील बबन लाहुडकार यांचे असून, ते टाकरखेड हेलगा येथील विष्णू पुरी यांनी कसण्यासाठी घेतले आहे. आजवरच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरले गेल्याने शेतकरी श्री. पुरी भांबावले असून, प्रशासनाने पाहणी करून त्यांना मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सुड्या पेटवणार्‍यांचा तपास लावून त्यांना अटक करण्याची मागणीही होत आहे.

दिवसेंदिवस सुड्या पेटवून शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात असताना प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याची तक्रार शेतकर्‍यांची आहे. त्यातच आज आणखी एक शेतकरी अशा विकृती बळी ठरला. श्री. पुरी यांनी शेतात तुरीच्या दोन सुड्या रचल्या होत्या. त्यातून 48 ते 50 पोते तूर होणार होती. असे असताना संध्याकाळी साडेसातला या दोन्ही सुड्या पेटल्याने आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी पाहिले. त्यांनी तातडीने गावात या घटनेची माहिती दिली. शेतकरी विष्णू पुरी आणि ग्रामस्थ तातडीने आग विझविण्यसाठी धावले. पण शेत बरेच दूर असल्याने जाईपर्यंत दोन्ही सुड्या जळून खाक झाल्या होत्या. या प्रकरणाची तक्रार अमडापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. तक्रार गांभीर्याने घेत रात्रीच पंचनाम्यासाठी पोलीस कर्मचारी श्री. ठाकूर आणि श्री. भुतेकर ग्रामस्थांसह गेले. श्री. पुरी यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: