बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

विजांचा कहर… बुलडाण्यात शेतकऱ्याचा घेतला बळी, चिखलीत हरभरा सुडी खाक!; बेमोसमी पावसाची हजेरी

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हवामान खात्याचा ( सहसा खरा न ठरणारा) अंदाज खरा ठरवत आज, 18 फेब्रुवारीला सकाळी पावसाने बुलडाणा, चिखली परिसरासह जिल्ह्यातील काही भागात चांगलीच हजेरी लावली! यादरम्यान अंगावर वीज कोसळून बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी येथील एका वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चिखली तालुक्‍यात वीज कोसळून हरभरा पिकाची सुडी जळाली.
बुलडाणा शहर व परिसरात 18 फेब्रुवारीला सकाळी पावणे अकराच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पाणी थेंब थेंब गळ या पद्धतीने सुरू झालेल्या या पावसाने नंतर वेग वाढवत सुमारे 25 मिनिटे हजेरी लावली. यामुळे शहरातील गारठा वाढला. सकाळपासूनच शहराच्या डोक्यावर ढग जमल्याचे दिसून आले. हवामान खात्याच्या अंदाजाला खरे ठरवतानाच हजारो शेतकऱ्यांची धास्ती वाढविण्याचे काम या लहरी अवकाळी पावसाने केले.
दरम्यान तालुक्यातील तांदुळवाडी येथे पडणारा हा पाऊस गावावर शोककळा पसरवणारा ठरला. गावातील बाबुराव भाऊराव रिंढे (60) शेतात गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडून ते गतप्राण झाले. त्यांच्या मुलाचे नुकतेच निधन झाल्याने रिंढे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्‍यातच हा दुसरा आघात रिंढे कुटुंबावर झाला आहे.

वीज कोसळल्याने हरभरा पिकाची सुडी खाक
वीज कोसळल्याने तीन एकरातील हरभरा पिकाची सुडी जुळून खाक झाल्याची घटना आज सकाळी सहाच्‍या सुमारास उत्रादा (ता. चिखली) येथे घडली. जिल्ह्यात 16, 17 आणि 18 फेब्रुवारीला बेमोसमी पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. दरम्यान रात्रीपासून चिखली तालुक्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर कमी असला तरी हवा आणि विजांचा कडकडाट अधिक होता. शेतकरी रामेश्वर मनोहर इंगळे यांच्या 3 एकर शेतातील हरभरा पिकाच्या सुडीवर वीज कोसळली. यात सुडी जुळून खाक झाली. वृत्त कळताच संबंधित विभागाचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: