खामगाव (घाटाखाली)

वीज चोरी करणाऱ्या 7 जणांना पकडले, तिघांविरुद्ध गुन्‍हे दाखल, चौघांकडून लाखाचा दंड वसूल

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महावितरणच्या पिंपळगाव राजा भाग एकचे सहायक अभियंता पंकज मिश्रा व भाग दोनचे कनिष्ठ अभियंता गजानन देशमुख यांनी वीज चोरीला आळा घालण्यासाठी मार्च व एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत वीज चोरी करणाऱ्या सात जणांना पकडले आहे. यापैकी तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर चार जणांकडून सुमारे एक लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामुळे विजेची चोरी करणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात विज चोरीच्या अधिक घटना घडत असल्याचे पहावयास मिळते. कोणी विद्युत तारांवर आकोडे टाकून तर काही जण मीटरमध्ये हेराफेरी करून विजेची चोरी करून महावितरणला चुना लावतात. विज चोरी होऊ नये म्‍हणून महावितरणच्या पिंपळगाव राजा भाग एक व भाग दोन कार्यालयांतर्फे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात दिनेश गावंडे, अनंता जुमळे, पवन बोबटकर, नंदू बोडदे, खोंदिल व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकातील कर्मचारी गस्त घालीत आहे आणि विज चोरट्यांवर करडी नजर ठेवून आहेत.

कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाये, उपकार्यकारी अभियंता संदीप शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरीच्या घटना उघडकीस आणण्यात आल्‍या आहेत. ज्यांना वीज पुरवठा पाहिजे त्यांना महावितरणच्या कार्यालयात रीतसर अर्ज करून पैशांचा भरणा करावा व त्या ग्राहकाला लवकरात लवकर विद्युत पुरवठा देण्याचा प्रयत्न राहील, असे शाखा अभियंता गजानन देशमुख यांनी सांगितले. वीज चोरी करताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल  नागरिकांनी विज चोरी करू नये, असे आवाहन सहायक अभियंता पंकज मिश्रा प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: