निरामय

वैवाहिक जीवनातील लैंगिक समस्या

जीवनात लैंगिकतेला फार महत्त्वाचं स्थान आहे. मनुष्य प्राणी लहानपणापासूनच लैंगिकतेचं शिक्षण समाजाकडून घेत असतो. मात्र, समाजाकडून मिळणार्‍या लैंगिकता शिक्षणात बरंच चांगलं, तर बरंच वाईट पण शिकलं जातं. त्याचप्रमाणे काही चूक, तर काही बरोबर अशा कल्पना किंवा समज मनात निर्माण होतात. आपले लैंगिक वर्तन या कल्पना, समजांवर आधारित असतं. लैंगिक भावना या खरंतर लहानपणापासून म्हणजेच किशोरावस्थेपासूनच असतात, पण त्याची प्रकर्षाने जाणीव तरुणपणात निर्माण होते. आपल्या समाजात लग्नाआधी बहुतांशी तरुण- तरुणी लैंगिक संबंधापासून दूर असतात. त्यामुळे या भावना जरी तरुणपणात निर्माण होत असल्या तरी खरं लैंगिक जीवन हे लग्नानंतरच सुरू होतं. याचमुळे लैंगिक जीवनातील समस्या जास्त प्रमाणात लग्नाच्या काही दिवस अगोदर किंवा काही दिवस नंतर लक्षात येतात. लग्नानंतर लैंगिक संबंध सुरळीत झाले तर वैवाहिक बंधन घट्ट होणं सोयीचं जातं, पण लग्नानंतर लगेचच काही समस्या आली तर मात्र वैवाहिक बंधन तयारच होत नाही. या समस्या सोडवता न आल्यास घटस्फोटापर्यंत विषय जातो. बर्‍याच जोडप्यांना लैंगिक समस्यांवर उपचार करणार्‍या योग्य व प्रशिक्षित डॉक्टरांबद्दल काहीच माहिती नसते. तसंच काही जण पारंपरिक वैद्य किंवा भोंदू डॉक्टरांच्या वर्तमानपत्रातील जाहिराती बघून त्यांच्याकडे जातात. पण ही मंडळी त्यांना घाबरवून पैसा कमवतात व समस्या तशीच असते. या समस्या मुख्यत्वे जननेंद्रियाच्या रचनेविषयी किंवा शरीरक्रियेविषयी शास्त्रोक्त माहिती नसणं, लैंगिक वर्तणुकीबद्दल गैरसमज, विवाहित जोडीदाराबद्दल असणारे संबंध यामुळे असतात. यात राग, थकवा, नैराश्य, पुरुषांमध्ये संबंधाचे दडपण या मानसिक कारणांमुळे पण लैंगिक समस्या उद्भवू शकतात. लैंगिक समस्यांच्या शारीरिक किंवा वैद्यकीय कारणांमध्ये संप्रेरकाची कमतरता किंवा जास्त प्रमाण, लैंगिक अवयवांचे आजार व मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यासारखे प्रदीर्घ रोग किंवा त्यांच्यावरील उपचार ही प्रमुख कारणं आहेत. पुरुषांमध्ये नपुसंकत्व, शीघ्रपतन व लैंगिक इच्छा नसणं, तर स्त्रियांमध्ये लैंगिक संवेदनाच नसणं (फ्रिझीडीटी), वेदनामय समागम व लैंगिक इच्छा नसणं या प्रमुख समस्या असतात. जवळपास 75-80 टक्के वेळेस या समस्या मानसिक कारणांमुळे उद्भवतात.

समुपदेशन, उपचार महत्त्वाचे…

समस्या लैंगिक समुपदेशन व उपचाराद्वारे बर्‍या होऊ शकतात. यात मुख्यत्वे दोन्ही जोडीदारांना उपचार पद्धतीत सहभागी करून त्यांचे लैंगिक व वैवाहिक संबंध सुरळीत केले जातात. पती-पत्नीला लैंगिक जीवनाबद्दल शरीररचना व क्रिया याबद्दल शास्त्रोक्त माहिती दिली जाते. त्यांना लैंगिक समस्या सोडवण्यासाठी लैंगिक क्रियांची माहिती दिली जाते व हळूहळू त्यांचे लैंगिक संबंध सामान्य करता येतात.

हा विचार कराच…

– रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरकडेच उपचारांकरता जावं. – वर्तमानपत्रातील जाहिराती बघून भोंदू डॉक्टरांकडे जाऊ नका. – लैंगिक समस्यांच्या उपचारांकरिता हजारो रुपये लागतात हे चूक आहे. डॉक्टरांजवळील औषध विकत घेणं टाळा. योग्य डॉक्टर नेहमी औषधोपचार लिहून देतो. डॉक्टरला प्रिस्क्रिप्शन मागा. – लैंगिक समुपदेशनाद्वारे विनाऔषधी, पण समस्यांचं समाधान होऊ शकतं. – स्वतःच औषधोपचार करणं टाळा. योग्य व प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्या. व्हायग्रा या गोळ्या प्रत्येक लैंगिक समस्येवर रामबाण उपाय आहे, असं समजू नका. – लैंगिक समस्या दीर्घकाळ रेंगाळत ठेवू नका. त्यावर त्वरित उपचार करा. – तुमच्या जोडीदाराला लैंगिक समस्या असल्यास त्याला धीर द्या. त्याच्याबरोबर उपचारात सहभागी व्हा. – लैंगिक समस्या बर्‍याच जणांना असतात. तुम्ही एकटेच त्यांनी ग्रस्त आहे, असं समजू नका.

– डॉ. श्‍वेता देसाई

 
 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: