क्राईम डायरीमुख्य बातम्या

व्हॉट्‌स ॲपवर बहिणीला मेसेज पाठवल्याच्‍या कारणावरून युवकाला भोसकले!; शिरपूर येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः व्हॉट्स ॲपवर बहिणीला मेसेज पाठविल्याच्या कारणावरून युवकाला चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना शिरपूर (ता. बुलडाणा) येथे काल, 11 जूनच्‍या रात्री घडली. यात गंभीर जखमी झालेल्या युवकाला अकोला येथे हलविण्यात आले आहे. ऋषिकेश मधुकर हिवाळे (17, रा. शिरपूर) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. या प्रकरणी आज, 12 जूनला रायपूर पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

काल 11 जूनला रात्री 9:30 वाजता ऋषीकेश हा त्‍याच्या घरासमोर उभा होता. त्‍याला गणेश रमेश शेळके (21) व वैभव काशिनाथ शेळके (23) हे मोटारसायकलवर बसवून घेऊन गेले. ऋषीकेशच्या आईने त्यांना कोठे चालले, असे विचारले असता 10 मिनिटांत परत येतो, असे त्‍यांनी सांगितले. रात्री साडेदहाच्‍या सुमारास शुभम राजू हिवाळे व शुभम गजानन हिवाळे हे ऋषिकेशला घेऊन घरी आले. ऋषिकेश गंभीर जखमी अवस्थेत होता. त्याला पोटाला व पायाला मार लागला होता. याबद्दल ऋषिकेशला विचारणा केली असता त्याने सांगितले की गणेश व वैभव यांनी त्याला मोटारसायकलवर बसवून पांगरी रोडवर नेले. तिथे वैभवच्‍या चुलत बहिणीला मॅसेज का पाठविले या कारणावरून दोघांनी ऋषीकेशला लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.

गणेशने त्‍याच्‍या बरगडीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ऋषीकेशच्या वडिलांनी त्याला उपचारासाठी बुलडाणा येथे हलविले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला अकोला येथे रेफर केले आहे. याप्रकरणी आज, 12 जूनला रायपूर पोलीस ठाण्यात ऋषीकेशचे वडील मधुकर शिवराम हिवाळे (48, रा. शिरपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेश व वैभव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपास रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: