क्राईम डायरी

शाळेची ताटं विकत होता भंगारवाल्याला!, ग्रामस्‍थांनी पकडले; वाघाळा येथील प्रकार

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शालेय पोषण आहाराची ताटं भंगारवाल्याला विकणाऱ्या मजुराला ग्रामस्‍थांनी रंगेहात पकडले. हा प्रकार वाघाळा (ता. सिंदखेड राजा) येथे समोर आला. मुख्याध्यापक गजानन भारती यांनी या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ताटं विकणाऱ्या मजुराला शाळेत कोरोना रुग्‍णांसाठी विलगीकरण कक्ष तयार करण्याचे काम देण्यात आले होते. त्‍याने शाळेतील ताटं घरी आणली आणि विकण्याचा प्रयत्‍न केला. मात्र या प्रकरणात त्‍याच्‍यासह आणखी काही जण सहभागी असण्याची शक्‍यता निर्माण झाली असून, त्‍यादृष्टीने पोलीस तपास होण्याची गरज ग्रामस्‍थांनी व्‍यक्‍त केली आहे.

एप्रिलमध्ये वाघाळा येथील जिल्हा परिषद शाळेत कोरोना रुग्‍णांसाठी विलगीकरण कक्ष तयार करायचा होता. त्‍याचे काम मुख्याध्यापकांनी शाळेत खिचडी तयार करणारा विकास प्रकाश गवारे आणि दशरथ उत्तम राठोड या दोघांना दिले होते. काही दिवसांपूर्वी यातील दशरथ राठोड हा शाळेतील शालेय पोषण आहाराची ११ ताटं (किंमत ११०० रुपये) भंगारवाल्याला विकताना ग्रामस्‍थ राजेश चव्हाण, रामराव आडे, राजेश गोदाबाई राठोड यांनी पाहिले. त्‍यांनी तिथे धाव घेतली असता भंगारवाला पळून गेला. ग्रामस्‍थांनी दशरथला ताब्‍यात घेऊन चौकशी केली असता त्‍याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्‍यामुळे ग्रामस्‍थांनी मुख्याध्यापकांना हा प्रकार कळवला व या प्रकरणाची तक्रार साखरखेर्डा पोलीस ठाण्यात करण्यात आली. अशा प्रकारे शालेय साहित्‍य विकण्याचे प्रकार याआधी पण घडले आहेत का, दशरथच या कृत्‍यात एकटा होता की त्‍याचे आणखी कुणी साथीदार आहेत, याची सखोल चौकशी होण्याची मागणी ग्रामस्‍थांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: