बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

शिल्ड ग्लास, मास्क, सॅनिटायझर अन्‌ सुरक्षित अंतराचे पालन!! संपूर्ण खोल्यांचे शुद्धीकरण, सीसीटीव्ही व मोबाइल जॅमरचाही होणार वापर!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हे शीर्षक वाचून ते एखाद्या रुग्णालयाचे वर्णन असेल असे तुम्हालाच काय कोणालाही वाटेल, पण हे वर्णन आहे आज, 21 मार्चला होऊ घातलेल्या एमपीएससी परीक्षेच्या कडक बंदोबस्ताचे! होय, बुलडाणा शहरातील  12 परीक्षा केंद्रावर  कोरोना विषयक असाच तगडा बंदोबस्त राहणार असून हे सर्व साहित्य थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पुरविण्यात आलेले आहे.

कोरोनामुळे अनेक वेळा पुढे ढकलण्यात आलेली ही परीक्षा अखेर कोरोनाच्या प्रकोपातच घेण्यात येत आहे. सकाळी 10 ते 2 आणि 3 ते 5 अशा दोन टप्प्यांत परीक्षा होत आहे. जिल्ह्यातील एकूण 3912 परीक्षार्थींसाठी शहरात 12 परीक्षा  केंद्र निर्धारित करण्यात आले आहेत. सामाजिक अंतर राखण्यासाठी या केंद्रातील (शाळा, महाविद्यालयांतील) तब्बल 163 वर्गखोल्या वापरण्यात येणार आहेत. यामुळे एका खोलीत फक्त 24 परीक्षार्थी राहतील असे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व खोल्या 20 मार्चच्या रात्री सॅनिटायझ करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व उमेदवारांना ग्लास शिल्ड, मास्क व सॅनिटायझर पुरविण्यात येणार आहे. या केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या 300 केंद्र प्रमुख, समवेक्षक, पर्यवेक्षक, परीक्षा लिपिक, समन्वय अधिकारी आणि शिपाई यांना देखील हा ‘अतिरिक्त ड्रेस कोड’ बंधनकारक आहे.

आयोगाचे पथक आणि तिसरा डोळा

दरम्यान, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती व आरडीसी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनात ही जय्यत तयारी करण्यात आली आहे. केंद्र प्रमुखांचे प्रशिक्षण देखील घेण्यात आले. आज सकाळी 12 केंद्रांवर रंगीत तालीम देखील घेण्यात आली. याशिवाय लोकसेवा आयोगाचे पथक देखील येथे दाखल झाले आहे, पथकातील अधिकारी 12 केंद्रांवर करडी नजर ठेवून राहणार आहे. याशिवाय 12 केंद्र व 163 वर्ग खोल्यातील सर्व हालचालींवर सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे. यावर कळस म्हणजे केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी मोबाईल जॅमर लावण्यात आले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: