बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

शिवछत्रपती स्मारक समितीच्या बहुप्रतिक्षित स्वप्नांची 22 फेब्रुवारीला पायाभरणी! 14 मेच्या मुहूर्तावर उभारणीचा निर्धार

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अखेर शिवछत्रपती बहुउद्देशीय स्मारक समितीने पाहिलेल्या महास्वप्नाची पूर्तता होण्याची घटिका आता समीप आलीय! 22 फेब्रुवारीच्या मंगलमय व छत्रपतींच्या आगमनाची वर्दी देणार्‍या सकाळच्या मुहूर्तावर समितीच्या स्वप्नांची विधिवत पायाभरणी होणार आहे!
सुमारे 6 वर्षांपूर्वी शिवछत्रपती बहुउद्देशीय स्मारक समितीने मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याच्या मुख्यालयी महाराष्ट्राचे दैवत, अस्मिता असलेल्या शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्धार केला. पक्षीय भेद विसरून व जाती- धर्माच्या भिंती तोडून गठीत झालेली समिती सर्व अडचणींवर मात करून आपल्या एकमेव ध्येयाजवळ पोहोचली. आज, 16 फेब्रुवारी रोजी बसस्थानक परिसरातील हॉटेल कृष्णा येथे समितीची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपस्थित समिती अध्यक्ष टी. डी. अंभोरे पाटील, कार्याध्यक्ष तथा समितीचे संकटमोचक आमदार संजय गायकवाड, उपाध्यक्ष राजेश हेलगे, सदस्य जि. प. सदस्य जयश्री शेळके, राजेश्‍वर उबरहंडे, सुभाष मानकर, मंगेश बिडवे, नितीन राजपूत, यांच्या चेहर्‍यावर महास्वप्न पूर्तीचा आनंद झळकत होता.
प्रारंभी अंभोरे पाटील यांनी समितीची आजवरची वाटचाल व 22 ला आयोजित भूमिपूजन सोहळ्याची माहिती दिली. सकाळी 10ः30 वाजता खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते बस स्थानक परिसरात नियोजित स्थळी शिवरायांच्या पूर्णाकृती अश्‍वारूढ पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन होणार आहे. पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्याला मंत्री यशोमती ठाकूर, गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, बुलडाणा अर्बनचे सीईओ सुकेश झंवर यांच्यासह विविध मान्यवर हजर राहणार आहेत. आमदार संजय गायकवाड व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विशेष सहकार्याने हे कार्य मार्गी लागल्याचे सांगून आमदार गायकवाड यांनी 11 लाखांचा धनादेश समितीला दिल्याचे त्यांनी सांगितले. आमदार गायकवाड यांनी 1 मेपर्यंत पुतळा बुलडाण्यात येणार असून, 14 मे रोजी त्याची उभारणी होईल, असे सांगितले, पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, भोवती 8 फुटांची भिंत, बुरुज, तट असे किल्ल्याचे स्वरूप देण्यात येणार आहे. याशिवाय सुरक्षा, दैनंदिन पूजन, स्वच्छता याचे नियोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.
दृष्टिक्षेपात पुतळा…

  • बुलडाणा बसस्थानक परिसरात होणार उभारणी.
  • देशातील सर्वात भव्य पुतळा असल्याचा समितीचा दावा.
  • 50 फूट उंच, 5 टन वजनाचा अष्टधातूपासून निर्मित.
  • पुणे येथील आल्हाद आर्ट्समध्ये निर्मिती.
  • 80 टक्के काम पूर्ण.
  • ओतीव काम अंतिम टप्प्यात.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: