जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

शिवसेनेने खुपसला पाठीत खंजीर, युतीत निवडणूक लढवून आता ‘अविश्वास’; सिंदखेड राजाच्‍या उपनगराध्यक्षांचा आरोप

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शिवसेनेने अविश्वास प्रस्‍ताव दाखल करून पाठीत खंजीर खुपसला आहे, असा घणाघाती आरोप उपनगराध्यक्ष सौ. नंदाताई मेहेत्रे यांनी केला आहे. शिवसेना- भाजपा युतीत भाजपाकडून सौ. मेहेत्र उपनगराध्यक्ष झाल्या आहेत.

2019 साली सिंदखेड राजा नगरपरिषदेची निवडणूक झाली. ही निवडणूक शिवसेना-भाजपाने युती करून लढवली. जागा वाटप व पद वाटप दोन्‍ही पक्षांनी समान करून घेतले. नगराध्यक्षपद शिवसेनेला तर उपनगराध्यक्षपद भाजपाला राहील, असे ठरले होते. मात्र दोन वर्षांनंतर शिवसेनेने भाजपाच्‍या उपनगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणून एकप्रकारे दगाबाजीच केल्याची भावना भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांत आहे. दुसरीकडे या प्रस्‍तावाविरोधात आम्‍ही न्‍यायालयात दाद मागू, असा पवित्रा उपनगराध्यक्षांनी घेतला आहे. अविश्वास प्रस्‍तावावरील अनेक नगरसेवकांच्‍या सह्या बोगस असल्याचा आरोपही त्‍यांनी करून सह्यांच्‍या पडताळणीही करण्याचा आग्रह करू, असे म्‍हटले आहे. त्‍यामुळे सिंदखेड राजातील राजकारण पुढील काळातही तापणार एवढे निश्चित.

फॉर्म्युला महाविकास आघाडीचा…
राज्‍यात अस्‍तित्‍वात असलेल्या महाविकास आघाडीसारखेच सिंदखेड राजातही शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्‍या हालचाली काही महिन्यांपासून सुरू होत्‍या. त्‍यासाठी दोन्‍ही पक्षांच्‍या नेत्‍यांनी एकत्र बैठकही घेतली होती. त्‍यानंतर उपनगराध्यक्षपद आपल्याकडे घेण्याचा ठाम निर्धार या पक्षांनी केला आणि त्‍यादृष्टीने हालचाली सुरू झाल्‍या. अविश्वास प्रस्‍ताव आणून हे पद राष्ट्रवादीच्‍या पदरात पाडण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. युतीत काय ठरले हे अर्थातच राज्‍यासारखेच सिंदखेड राजातही प्रश्नांकित असल्याने उपनगराध्यक्षांच्‍या प्रयत्‍नांना कितपत यश मिळते याची उत्‍सुकता सिंदखेड राजा वासियांना लागली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: