निरामय

शीघ्रपतन… एक सामान्य समस्या

खरं तर शीघ्रपतन हा काही आजार नाही. ती एक सवय आहे. पुरुषांच्या लैंगिक प्रतिसादात लैंगिक उत्तेजना, शिश्‍नाची ताठरता व वीर्यस्खलन या प्रक्रिया होतात. स्खलन झाल्यानंतर ताठरता कमी होत- होत नष्ट होते. शीघ्रपतनावर उपचार करताना या लैंगिक प्रतिसादावर विशेष लक्ष द्यावं लागतं. डॉक्टर लग्नाला दोन महिने झाले, पण शारीरिक संबंधात मी फारच कमी पडतो. मला तिचं समाधान करता येत नाही. मी फार आधीच संपतो. यामुळे मला आता रोज रात्री घरी जाण्याचीच भीती वाटते. आता तर माझ्यातलं पौरुषत्व संपल्यासारखं वाटतं. काय करावं तेच समजत नाही… 29 वर्षांचा तरुण फार उद्विग्नपणे सांगत होता. लग्नानंतर लगेचच त्याचे शारीरिक संबंध स्थापित झाले. परंतु त्यात त्याचं वीर्यस्खलन लवकर होत होतं. त्यामुळे पत्नीचं समाधान होत नव्हतं. या सर्व प्रकारामुळे त्याला मानसिक दडपण आलं होतं. त्याची भीती अजूनच वाढू लागली. त्यातच तो अविवाहित असताना कधी- कधी हस्तमैथुन करत असे. त्याने कुठेतरी वाचले की हस्तमैथुनामुळे नपुंसकत्व येतं, म्हणून तो फारच घाबरलेला होता. ही फार कॉमन समस्या असून, यावर योग्य उपचार घेतत्यास ती बरी होऊ शकते. हे त्याला सुरुवातीलाच समजावून सांगितलं. खरं तर शीघ्रपतन हा काही आजार नाही. ती एक सवय आहे. शीघ्रपतनावर उपचार करताना या लैंगिक प्रतिसादावर विशेष लक्ष द्यावं लागतं. लैंगिक संबंधात उत्तेजना व वीर्यस्खलन या दोन क्रियांमध्ये बरंच अंतर असतं. पण अनुनभवी व नवपरिणीत पुरुषांमध्ये हे अंतर फारच कमी असतं. त्यांची उत्तेजना फार लवकर परमोत्कर्षापर्यंत पोहोचते व वीर्यस्खलन ताबडतोब होतं. यात बर्‍याच जणांना प्रश्‍न असतो की, संबंध किती वेळ टिकायला हवा, पण याचं एकसारखं उत्तर देणं अशक्य आहे. उत्तेजना ते स्खलन यातील वेळ प्रत्येक पुरुषामध्ये वेगवेगळा असू शकतो. काहींमध्ये हा फारच कमी असल्याने तरुणासारखी अवस्था निर्माण होते. प्रत्येक पुरुषाला वीर्यस्खलन होण्याअगोदर काही संवेदना होतात. या संवेदना ओळखून वीर्यस्खलन थांबवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास वीर्यपतन लांबवता येतं. पुरुष लैंगिक प्रतिसादात कामतृप्तीच्या वेळेस वीर्यकोष, वीर्यवाहक नलिका व पुरुषस्थ ग्रंथी यांचे लयबद्ध आकुंचन सुरू होते. त्यामुळे वीर्यकोषात साठलेले वीर्य वीर्यनलिकेतून बाहेर येते. यावेळेस वीर्यपतन अटळ असते. ही अवस्था आल्यानंतर पुरुषांनी जाणीवपूर्वक उत्तेजना बंद केल्यावरही वीर्यपतन होतंच. तेव्हा वीर्यस्खलन थांबवण्यासाठी प्रत्येक पुरुषांनी ही अवस्था येण्याअगोदरच समागमात थोडा वेळ थांबायला हवं. ही अवस्था येण्याअगोदर प्रत्येक पुरुषाला काही संवेदना होतात. त्या संवेदना ओळखून जर त्याच वेळेस उत्तेजना आणणं बंद केलं, तर वीर्यस्खलन होत नाही. परत काही वेळानंतर समागम सुरू करता येतो. ही प्रक्रिया तीन-चार वेळा केल्यानंतर वीर्यस्खलन होऊ द्यावं. अशाप्रकारे प्रयत्न केल्यास काही आठवड्यात त्यांचे शीघ्रपतन कमी होऊन दोघांनाही कामतृप्तीचा अनुभव घेता येऊ शकतो. शीघ्रपतनावर बरीचशी औषधेपण देता येतात. या औषधाचा प्रभाव फक्त औषध घेत असेपर्यंत असतो. औषध बंद केल्यास पुन्हा शीघ्रपतनाचा त्रास सुरू होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर या औषधांमुळे काही लैंगिक दुष्परिणाम पण होऊ शकतात. म्हणूनच औषध घेण्याऐवजी ही लैंगिक सवय सोडण्याकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे. याचबरोबर लैंगिक संबंधात स्त्री- पुरुष दोघांचीही कामतृप्ती एकाच वेळेस होणं प्रत्येक वेळेस संभव नसतं. त्यामुळे पुरुषांनी सुरुवातीला (फोर-प्ले) स्त्रियांची उत्तेजना कामतृप्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी संभोगाव्यतिरिक्त इतर मार्गांचा वापर केल्यास त्यांचेपण समाधान होऊ शकतं. या सर्व बाबी लैंगिक समुपदेशनात चर्चिल्या जातात. लैंगिक समुपदेशनाद्वारे ही समस्या लवकर सोडवता येते. – डॉ. श्‍वेता देसाई

 
 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: