बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

शूऽऽ कडक लॉकडाऊन आहे, पण फक्‍त व्यापाऱ्यांसाठी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कडक लॉकडाऊन चालू आहे, पण तो फक्‍त व्यापाऱ्यांसाठी आहे… सोमवार ते शुक्रवारचे कडक निर्बंधही फक्‍त व्‍यापाऱ्यांसाठीच आहेत. लोक कडक लॉकडाऊनमध्येही रस्‍त्यावर फिरतात, कडक निर्बंध असतानाही गर्दी करतात… 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, हे फक्‍त म्‍हणायला आहे. कडक लॉकडाऊन, निर्बंध हा फक्‍त फार्स आहे का, याने खरंच कोरोना आटोक्‍यात येणार आहे का? असे अनेक प्रश्न सध्या बुलडाणेकरांना पडले आहेत. लॉकडाऊन करायचा तर 15 दिवस एकदम कडक करा, कुणालाही रस्‍त्‍यावर फिरू देऊ नका. अन्यथा असे लॉकडाऊन वारंवार होत राहतील आणि कोरोनाही वाढतच राहील, असे भावनिक आवाहन वारंवार अशा आदेशांचे शिकार होणाऱ्या जिल्ह्यातील 30 हजारांवर व्‍यापाऱ्यांनी सरकार आणि प्रशासनाला केले आहे.

बुलडाणा लाइव्‍हकडे अनेक व्‍यापाऱ्यांनी संपर्क करून कडक लॉकडाऊन आणि निर्बंधाबद्दल नाराजी व्‍यक्‍त केली आहे. त्‍यांच्‍या मते, हा लॉकडाऊन आणि निर्बंध केवळ फार्स आहे. केवळ दाखवण्यासाठी हे सर्व सुरू आहे की काय, असा संशय येतो. कोरोना वाढीला व्‍यापारीच जबाबदार असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. याउलट कोणत्‍याही अन्य आस्‍थापनांपेक्षा व्‍यापारी कोरोनाबद्दल जास्‍तीत जास्‍त काळजी घेतो. मास्‍क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतराला प्रत्‍येक व्‍यापारी प्राधान्य देतो. व्‍यापाऱ्यांना नियम ठरवून द्या, हवे तर आणखी काही कडक नियम करा. मात्र त्‍यांची दुकाने बंद करून त्‍यांच्‍यासह त्‍यांच्‍याकडे कामावर असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्‍या आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांच्‍या पोटावर पाय पडतोय, याकडे ना सरकारचे लक्ष जातेय, ना प्रशासनाचे. अनेकांनी कर्ज घेऊन दुकाने टाकली, अनेकांची दुकाने भाड्याच्‍या जागेत आहेत. हे हप्‍ते थकले आहेत, त्‍यावरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतोच आहे. गेले 1 वर्ष असेच संकटात गेले. कुठेतरी यंदा सर्व सुरळीत होण्याची आशा असतानाच पुन्‍हा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन संकट कोसळले आहे. नुकसान सातत्‍याने होतच आहे, पण आपली आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची उपासमार होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे, असे व्‍यापाऱ्यांचे म्‍हणणे आहे.

लोक बिनधास्‍त फिरतात…
काल आणि आज रविवारी कडक लॉकडाऊन आहे. पण तो केवळ नावालाच आहे का की फक्‍त व्‍यापाऱ्यांसाठीच आहे, हा प्रश्न पडतो. कारण रस्‍त्‍यावर बिनधास्‍त लोक फिरताना दिसतात. एवढ्या मोठ्या संख्येने फिरणाऱ्या सर्वच लोकांना अत्‍यावश्यक काम पडले असेल का? यामुळे कोरोना वाढत नाही का? असा प्रश्न व्‍यापाऱ्यांनी केला आहे.

100 टक्‍के लॉकडाऊन करा…
कडक निर्बंध आणि शनिवार-रविवारच्‍या कडक लॉकडाऊनमुळे कोरोना थांबणार नाही. त्‍यासाठी किमान 14-15 दिवस कडकडीत लॉकडाऊन होणे गरजेचे आहे. या काळात केवळ अत्‍यावश्यक सेवा वगळता कुणालाच रस्‍त्‍यावर फिरण्याची परवानगी नको. असे केले तरच कुठे तरी कोरोनाची ही साखळी तुटेल. अन्यथा 15 -15 दिवसांचा हा लॉकडाऊन सुरूच राहील आणि याचे बळी फक्‍त व्‍यापारीच ठरतील, अशी भीतीही व्‍यापाऱ्यांनी व्‍यक्‍त केली आहे.


कर, बिले भरून घेतली, अन्‌…
जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये सर्व रूळावर येण्याची आशा निर्माण झाली होती. त्‍यामुळे व्‍यापाऱ्यांनाही दिलासा दिसत होता. याच काळात नगरपालिकेने करवसुली केली. महावितरणनेही कनेक्‍शन कट करून बिले भरून घेतली आणि पुन्‍हा कनेक्‍शन जोडली. व्‍यापाऱ्यांनीही आता गाडी रूळावर येईल या आशेपोटी बिले भरली, कर भरले. पण 31 मार्चनंतर पुन्‍हा लॉकडाऊनची कुऱ्हाड कोसळली, असे व्‍यापाऱ्यांनी सांगितले.


व्‍यापाऱ्यांचे मानसिक आरोग्‍य खालावलेय…

सततच्‍या लॉकडाऊन आणि कोरोनाच्‍या वाढीमुळे व्‍यवसाय डबघाईला आले आहेत. कर्जाचा डोंगर वाढला आहे. बुलडाणा शहरात अंदाजे 2 हजार व्‍यापारी सध्या कडक निर्बंधांमुळे चिंतित आहेत. हा आकडा जिल्ह्यात 30 हजारांच्‍या घरात आहे. प्रत्‍येक व्‍यापाऱ्यावर किमान 4-5 कर्मचारी अवलंबून असतात. ही सर्व कुटुंब मोठ्या संकटातून जात आहेत.

– आनंद संचेती, कापड आणि रेडिमेड व्‍यापारी मर्चंट असोसिएशन बुलडाणा

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: