शेगावमध्ये टवाळखोरांचा रात्रीचा हैदोस… चौकात, दुभाजकावर बसून मध्यरात्रीपर्यंत घालतात गोंधळ, परवा रात्री ‘हद्दच’ केली!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरात सध्या कडक निर्बंधामुळे रस्ते लवकर सुनसान होतात. पण ही जणू टवाळखोरांना संधी झाली असून, मध्यरात्रीपर्यंत त्यांचा धिंगाणा सुरू असतो. चौकात जमून, दुभाजकावर बसून दारू पिणे, येणाऱ्या जाणाऱ्या शिविगाळ करणे, रहिवाशांचा उद्धार करणे या कारनाम्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परवा रात्री तर हद्दच झाली. रात्री बेरात्रीपर्यंत आमच्या घरासमोर बसू …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरात सध्या कडक निर्बंधामुळे रस्‍ते लवकर सुनसान होतात. पण ही जणू टवाळखोरांना संधी झाली असून, मध्यरात्रीपर्यंत त्‍यांचा धिंगाणा सुरू असतो. चौकात जमून, दुभाजकावर बसून दारू पिणे, येणाऱ्या जाणाऱ्या शिविगाळ करणे, रहिवाशांचा उद्धार करणे या कारनाम्यांमुळे नागरिक त्रस्‍त झाले आहेत. परवा रात्री तर हद्दच झाली. रात्री बेरात्रीपर्यंत आमच्‍या घरासमोर बसू नका, असे सांगायला गेलेल्या नागरिकाला नशेत धुंद तीन तरुणांनी मारहाण केली. दारूची बाटली नागरिकाच्‍या डोक्‍यात घातली. या नागरिकाने शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शहरात पेट्रोलिंग वाढविण्याची गरज या घटनेमुळे पुन्‍हा एकदा समोर आली असून, या टवाळखोरांना आता पोलिसांनीच आवरण्याची गरज निर्माण झाली आहे.

ज्ञानेश्वर रमेश नेमाडे (24) बाळापूर रोडवरील  भुतबंगला परिसरात राहतात. त्‍यांच्‍या शेजारी बाठे पाटील यांचे किराणा दुकान आहे. घरासमोरील रस्‍त्‍याच्‍या दुभाजकावर बसून रात्री उशिरापर्यंत काही मुले व माणसे दारू पितात. मध्यरात्रीपर्यंत जोरजोराने बोलतात व शिविगाळ करतात. 4 मे रोजी रात्री 11.30 वाजेच्‍या सुमारास नागेश गावंडे (20, रा. संगमनगर, शेगाव) व त्‍याचे 3 मित्र (वय 20 ते 22) रस्‍त्‍यावर धिंगाणा घालत होते. तेथून ते मुरारका चौकात गेले व परत आले. पुन्‍हा शिविगाळ करू लागले. त्‍यांना नेमाडे यांनी रात्री बेरात्रीपर्यंत आमच्‍या घरासमोर बसू नका. तुमच्यामुळे आम्हाला त्रास होतो, असे म्हटले. त्‍यावर नागेशने त्याच्‍या हातात असलेली दारूची बाटली त्‍यांच्‍या डोक्यावर मारली. त्यामुळे ते जखमी झाले. नागेशच्‍या 3 मित्रांनी शिविगाळ करून जिवाने मारण्याची धमकी दिली. त्‍याचवेळी शशिकांत रमेश घोंगटे (रा. मोदीनगर) व शुभम महादेव लबाने धावून आले आणि त्‍यांनी तरुणांच्‍या ताब्‍यातून नेमाडे यांना सोडवले. नेमाडे यांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी नागेशसह त्‍याच्‍या 3 मित्रांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.