जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

शेगावमध्ये दिग्गजांना झटका! महाविकास आघाडीची चलती…

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिनाभरापासून सुरू झालेली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आज निकाल घोषित झाल्यानंतर थांबली. या निवडणुकीत मतदारांनी प्रचंड उलटफेर केल्याचे निकालानंतर दिसून आले असून दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र समोर येत आहे.

तालुक्यातील झाडेगाव, माटरगाव, जलंब, घुई, जानोरी, वरखेड बुद्रूक, गौलखेड, मनसगाव, भास्तन, सांगवा, पहुरपूर्णा, आडसूळ, आळसणा या ग्रामपंचायतीच्या निकालांकडे जनतेचे विशेष लक्ष लागून होते.

वंचितचे नेते भास्करराव पाटील यांचे वर्चस्व कायम

वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा माजी जि.प.उपाध्यक्ष भास्करराव पाटील यांनी झाडेगाव ग्रा.पं.वर वर्चस्व कायम राखले असून, जेव्हापासून ग्रामपंचायत अस्तित्वात आली तेव्हापासून झाडेगाव ग्रामपंचायत भास्करराव पाटील यांच्याकडे आहे. श्री. पाटील यांच्यासह माजी पं. स.सभापती विठ्ठल पाटील व माजी जि.प.सदस्या शारदाताई पाटील यांचे गाव असल्यामुळे या गावाच्या निकालाकडे राजकीय विश्‍लेषकांचे लक्ष लागून होते. दिग्गजांनी या गावात परिवर्तनासाठी प्रयत्न केले होते. परंतु भास्करराव पाटील यांनी वर्चस्व कायम ठेवले असून विरोधकांना पराभवाची धूळ चारत त्यांच्या पॅनलचे सातचे सातही उमेदवार निवडून आले आहेत. विरोधकांना एकाही जागी विजय मिळविता आला नाही.

काँग्रेस नेते दयारामभाऊ वानखडेंचाही गड कायम

काँग्रेस नेते तथा माजी पं.स.सभापती दयारामभाऊ वानखडे यांच्या पॅनलला बहुमत प्राप्त झाले असून मागील 60 वर्षांपासूनचे आडसूळ ग्रा.पं.वरील वर्चस्व त्यांनी कायम ठेवले आहे. दयारामभाऊ वानखडे यांच्या कुटुंबातील स्व.श्रीराम वानखडे हे 40 वर्षे सरपंच होते. त्यानंतर आत्माराम वानखडे हे 10 वर्षे सरपंच होते. सुनिताताई आत्माराम वानखडे मागील 10 वर्षापासून सरपंच आहेत. यावरून आडसूळ गावातील लोकांनी पुन्हा एकदा वानखडे कुटुंबीयावर विश्‍वास दाखविल्याचे दिसून येत आहे. भाजप पुरस्कृत विरोधी गटाच्या पॅनलला 3 जागा मिळाल्या आहेत.

गौलखेड ग्रा.पं. मध्ये भाजपचा सफाया

गौलखेडवासीयांनी प्रचंड उलटफेर केला असून भाजपा नेते पांडुरंग शेजोळे यांच्या पॅनलचा सफाया केल्याचे दिसून येत आहे. गौलखेड येथे काँग्रेसचे युवा नेते ज्ञानेश्‍वर भाऊराव शेजोळे यांच्या नेतृत्वातील पॅनलचे सात पैकी सातही उमेदवार निवडून आले असून भाजप पुरस्कृत एकही उमेदवार विजयी होऊ शकला नसल्याने भाजपा नेत्यांना मोठा झटका बसला आहे. मनसगाव येथे परिवर्तन पॅनल मनसगाव ग्रा.पं.मध्ये परिवर्तन झाले असून माजी सरपंच सुरेश पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलच्या केवळ दोन जागा निवडून आल्या आहेत. अ‍ॅड.गोपाल आखरे व सै.साजिद यांच्या परिवर्तन पॅनलचे 7 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्य सै.साजीद सै.साबीर यांचाही समावेश आहे. ग्रामविकास पॅनलचे सुरेश कराळे व त्यांच्या पत्नी माजी सरपंच निता कराळे या निवडून आल्या आहेत.

जानोरी येथे भाजप व मनसेचा सफाया

जानोरी ग्रा.पं.मध्ये ग्रामविकास पॅनलचा विजय झाला असून भाजपा व मनसे प्रणित पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नसल्याने या पक्षाच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. ग्रामविकास पॅनलचे नेते नितीन बाराहाते, काशीराम डांगे, रमेश सावळे, सुधाकर ढोले, निलेश चितोडे, धोंडूराम घेंगे यांच्या पॅनलचे सर्वच 9 जागी उमेदवार विजय झाले आहेत. तर भाजपा नेते संतोष देशमुख व मनसे नेते विनोद टिकार यांच्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

माटरगावात महाविकास आघाडी; भाजपाचा सफाया

माटरगाव ग्रामपंचायतीवर अनंता आळशी, सुरेश वनारे, इनायत खान, गोपाळ आखरे यांच्या महाविकास आघाडीने वर्चस्व कायम केले असून येथे भाजपचे तालुकाध्यक्ष राजू देवचे व माजी पं.स.सभापती भगवान भोजने यांच्या ग्रामविकास पॅनलचा सफाया झाल्याचे दिसून येत आहे. या ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडीला 17 पैकी 14 जागी विजय मिळाला असून विरोधी गटाला केवळ 3 जागाच काबीज करता आल्या आहेत. महाविकास आघाडीकडून जुगल गांधी, गोपाळराव मिरगे, श्रीकांत तायडे हे दिग्गज निवडून आले आहेत.

घुई हिंगणा येथे महाविकास आघाडी

घुई हिंगणा ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळाले असून येथे वंचित बहुजन आघाडी व भाजपा प्रणित पॅनलच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे दिसून येत आहे. वंचित नेते तथा विद्यमान जि.प.सदस्य राजाभाऊ भोजने व भाजपा नेते तथा कृउबास समितीचे संचालक देवानंद घुईकर यांना मात्र आपल्या होम पिचवर फारकाही करता आल्याचे दिसून येत नाही.

सांगवा ग्रा.पं.मध्ये अनिल घाटे पॅनलचा संपूर्ण सफाया

सांगवा ग्रा.पं.मधून माजी सरपंच अनिल घाटे यांच्या पॅनलचा संपूर्ण सफाया झाला असून विरोधी गटाने सातही जागी बाजी मारली आहे.

पहुरपुर्णा ग्रा.पं.मध्ये परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

पहुरपुर्णा ग्रा.पं.मध्ये महादेवराव पाटील, मधु भारसाकळे, जगन्नाथ उमाळे, अनंता बरडे यांच्या परिवर्तन पॅनलचे सर्व 7 उमेदवार निवडून आले आहेत.

वरखेड-टाकळी ग्रा.पं.मधून माजी सरपंच अर्चना हिंगणे विजयी

वरखेड-टाकळी येथून माजी सरपंच अर्चना केशवराव हिंगणे यांनी विजय मिळविला आहे. मात्र केशवराव हिंगणे यांच्या पॅनलला बहूमत मिळविता आले नाही. त्यामुळे सरपंच पदाच्या निवडणूकीत यावेळी परिवर्तन होईल असे दिसून येत आहे.

वंचितचे प्रभाकर पहूरकर पराभूत

संपूर्ण तालूक्याचे लक्ष लागून असलेल्या भोनगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे युवानेते प्रभाकर पहूरकर व काँग्रेस नेते लक्ष्मण गवई यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत लक्ष्मण गवई यांनी बाजी मारली असून प्रभाकर पहूरकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

जलंब ग्रा.पं.मधून दोन माजी सरपंच पराभूत

जलंब ग्रामपंचायतीवर नाना गव्हांदे यांच्या ग्रामविकास पॅनलचे 13 पैकी 7 उमेदवार विजयी झाल्याने जलंब ग्रा.पं.वर नाना गव्हांदे व त्यांचे सहकारी पं.स.सदस्य विठ्ठल सोनटक्के, उत्तम घोपे यांचा वरचष्मा दिसून आला. विरोधी गटातील भाजपाचे श्याम चोपडे, दिलीप शेजोळे व भैय्या देशमुख यांच्या एकता पॅनलचे केवळ 4 उमेदवार निवडून आले असून या पॅनलचे दिग्गज उमेदवार माजी सरपंच दिलीप शेजोळे व माजी सरपंच अनिल उर्फ बबलू देशमुख यांना जनतेने पराभूत केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: