क्राईम डायरीमुख्य बातम्या

शेगाव मर्डर मिस्‍ट्री : अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानेच त्‍याचा गेम; भावजयी बेपत्ता असल्याने वाढला संशय

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नागझरी (ता. शेगाव ) जवळील जुन्या क्रॉसिंग लाईनवर 18 एप्रिल रोजी हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. याप्रकरणात पत्‍नीनेच साथीदारासह पतीचा खून केल्याचे निष्पन्‍न झाल्याने दोघांनाही काल, 21 एप्रिल रोजी शेगाव रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. अटक केलेली पत्‍नी रेखा दांदळे आणि तिचा साथीदार संतोष साठे यांच्‍या प्रेमसंबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्यानेच त्यांनी रामधन दांदळे यांचा खून केला. विशेष म्हणजे रामधन यांची भावजय संगीता मार्तंड दांदळे गेल्या 9 एप्रिलपासून बेपत्ता असल्याने तिच्‍याही बेपत्ता होण्यामागे या दोघांचा तर सहभाग नाही ना, यादृष्टीने आता तपास केला जात आहे. 9 एप्रिल रोजी सकाळी  11 वाजता नागझरी शेतशिवारातून संगीता दांदळे बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी शेगाव पोलिस ठाण्यात संगीता यांची मुलगी पूजा नितीन तायडे यांनी 11 एप्रिल रोजी तक्रार दिली होती.

रामधन दांदळे यांचे नागझरी येथे पंक्चरचे दुकान होते. बलदंड शरीयष्टी आणि मनमिळावू स्वभाव असल्याने रामधन यांच्या खुनाच्या बातमीने खळबळ उडाली होती. सात जन्म सोबत जगण्याची शपथ घेणाऱ्या पत्नीनेच अनैतिक संबंधामुळे पतीची हत्या केल्याने पती पत्नीच्या पवित्र नात्याला रेखाने कलंक लावल्याची चर्चा परिसरात होत आहे. यातच त्यांची भावजय सुद्धा बेपत्ता असल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 25 एप्रिल पर्यंत पोलीस  कोठडी सुनावण्यात आली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: