क्राईम डायरीमुख्य बातम्या

शॉक लागून मृत्‍यू; मग शरीरावर जखमा कशा?; विवाहितेचा छळ झाल्याचा पित्‍याचा आरोप, ५ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः कुलरने शॉक लागून विवाहितेचा मृत्‍यू झाल्‍याची प्रकरणी सासरच्या ५ जणांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला. तिच्‍या वडिलांनी तिच्‍या मृत्‍यूबद्दल अनेक प्रश्न उपस्‍थित करून तक्रार दिली आहे. शॉक लागून मृत्‍यू झाला तरी तिच्‍या शरीरावर जखमा असल्याने तिला छळ झाल्‍याचा संशय तक्रारीत व्‍यक्‍त केला आहे.

मलकापूर शहरातील राणाप्रताप नगरात ही घटना ३० जूनला घडली होती. दुर्गा महेश चांडक (३०) या विवाहितेचा घरकाम करताना कुलरचा शॉक लागून मृत्‍यू झाला होता. तिचा विवाह सहा महिन्यांपूर्वीच झाला होता. तिचे वडील राजेश श्रीकिशन राठी (नागपूर) यांनी तक्रारीत म्‍हटले आहे, की त्‍यांना घटनेच्‍या दिवशी दुपारी १२ वाजता त्‍यांची मुलगी गंभीर अवस्‍थेत आयसीयूमध्ये असल्याचे फोनवरून कळविण्यात आले. शॉक लागून तिचा मृत्‍यू झाला असला तरी तिच्‍या शरीरावर जखमा असल्याने तिचा छळ झाला आहे.

याचबरोबर अन्य काही गोष्टी त्‍यांनी तक्रारीत नमूद केल्या आहेत. त्‍यावरून शहर पोलिसांनी तिचा पती महेश सुरेशचंद्र चांडक याच्‍यासह जयश्री स्मित मोहता, सुरेशचंद्र चांडक, आकाश सुरेशचंद्र चांडक, सुनिता सुरेशचंद्र चांडक यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. महेशला ३ जुलैला अटक करण्यात आली आहे. तिचा दीर आकाश (२५) याला ४ जुलैला अटक करण्यात आली. दोघाही भावांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक स्मिता म्‍हसाय करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: