क्राईम डायरी

शौचालयावरून दोन कुटुंबात राडा!; 9 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल, चांदुरबिस्वा येथील घटना

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शौचालयाच्‍या वापरावरून दोन कुटुंबात राडा झाला. नांदुरा पोलिसांनी या प्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केल्याची घटना नांदुरा तालुक्‍यातील चांदुरबिस्वा येथे 13 जूनच्‍या सकाळी 11 च्‍या सुमारास घडली.

अत्ताउल्ला खान, त्‍यांची पत्नी हसनुरबी, मुलगी शगुपताबी, नाहीशताबी व सून पिंकि, फिरदौसबी खान, जाहिद खान, वाजिद खान, जावेद खान (सर्व रा. चांदुरबिस्वा) अशी गुन्‍हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सौ. रुक्सानाबी मुस्ताकउल्ला खान (50) यांनी तक्रार दिली की, त्‍यांच्‍या शेजारी अत्ताउल्ला खान राहतात. ते नेहमी जागेवरून आमच्याशी वाद करत असतात व म्हणतात की, ती सर्व जागा आमची आहे. आम्ही पुण्याला पाच वर्षांसाठी गेलो होतो तेव्हा अत्ताउल्ला खान यांनी आमच्‍याकडील शौचालय वापरासाठी मागितले होते. ते आम्‍ही दिले होते. आम्‍ही परत आल्यानंतर 13 जूनला सकाळी 11 च्या सुमारास मी व माझी मुले शकीरउल्ला खान, शारीकउल्ला खान, आतिक उल्ला खान, तौसिफउल्ला खान, मुजिबउल्ला खान, रजा खान, मुसद्दीक उल्ला खान व सून अजराबी यांच्‍यासह घरी हजर होतो. अत्ताउल्ला खान व त्यांची मुले शौचालय परत देत नसल्याने माझ्या मुलांनी ते शौचालय हातोडा व सबळने तोडण्यास सुरुवात केली.

तेव्हा अत्ताउल्ला खान यांची पत्‍नी हसनुरबी व त्यांची मुलगी शगुपताबी, नाहीशताबी व सुन पिंकी, फिरदौसबी या बाहेर आल्या. त्यांनी आम्हाला जोर जोराने अश्लिल भाषेत शिविगाळ केली. त्यानंतर हसनुरबी व त्यांची मुलगी शगुपताबी, नाहीशताबी व सून पिंकी फिरदौसबी अत्ताउल्ला खान, जाहिद खान, वाजिद खान, जावेद खान यांनी घरात घुसून लोटपाट करून शिविगाळ केली. अत्ताउल्ला खान यानेही लोटपाट केली. त्यामुळे माझ्या उजव्या हाताला मार लागला आहे. त्यानंतर त्यांनी मला व माझे मुलांना जिवाने मारून टाकण्याची धमकी दिली, असेही तक्रारीत सौ. रुक्सानाबी खान यांनी म्‍हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: