बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Update : शांततेत परतणाऱ्या आमदार कुटेंवर मोताळ्यात पुन्‍हा हल्ल्याचा प्रयत्‍न; पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांना पिटाळले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आमदार संजय गायकवाड यांनी भाजपच्‍या वरिष्ठांवर अत्‍यंत खालच्‍या भाषेत केलेली टीका, त्‍यानंतर विजयराज शिंदे यांची पुतळा जाळण्याची जयस्तंभ चौकात अंगलट आलेली स्‍टंटबाजी, त्‍यातून झालेला राडा, त्‍याचवेळी जळगाव जामोदमध्ये आमदार संजय कुटे यांनी संजय गायकवाडांविरुद्ध केलेली आक्षेपार्ह टीका आणि मग या टीकेला प्रत्युत्तर म्‍हणून पुन्हा संजय गायकवाड यांनी कुटेंना 50 किलोमीटरच्‍या अंतरात येण्याचे दिलेले चॅलेंज… पोलिसांनी दोन्‍ही गटांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल केलेले गुन्‍हे… या सर्व पार्श्वभूमीवर परिस्‍थिती अन्‌ वातावरण कोणत्या वेळी कोणते वळण घेईल याची शाश्वती नसताना आमदार संजय कुटे यांनी गायकवाडांचे चॅलेंज स्‍वीकारत आज, 19 एप्रिलला दुपारी दीडच्‍या सुमारास बुलडाण्यात पाऊल ठेवले.

त्‍यांच्‍यासोबत चिखलीच्‍या आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार चैनसुख संचेती हेही आले. सोबत जिल्हाभरातून 400 ते 500 कार्यकर्तेही दाखल झाले. हा सर्व जमाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. तिथे आमदार कुटेंनी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची भेट घेत गायकवाडांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. त्‍यानंतर कुटे आणि सोबतची प्रमुख नेतेमंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात गेली. तिथून भाजपा कार्यालयात येत कुटेंनी पत्रकार परिषद घेतली. राजकारणाची ही वेळ नाही असे म्‍हणत आमच्‍यासाठी हा विषय संपल्याचे जाहीर केले. तिथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेही उपस्‍थित होते. या ठिकाणी मात्र कोरोनावरच चर्चा झाल्‍याचे सांगण्यात येत असले तरी पालकमंत्र्यांनी या वादंगावर पडदा पाडण्यासाठी पुढाकार घेतल्‍याची चर्चा आहे. एकीकडे वाद मिटल्‍याने जिल्हावासिय सुटकेचा निःश्वास टाकत असतानाच जळगाव जामोदकडे परतणाऱ्या आमदार कुटेंच्‍या गाडीवर जयस्‍तंभ चौकातील गायकवाडांच्‍या कार्यालयाजवळ पन्‍नासेक तरुणांनी दगडफेक केली. त्‍यामुळे वातावरण पुन्‍हा पेटले असून, जोपर्यंत गायकवाड आणि दगडफेक करणाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्‍ही बुलडाणा सोडणार नाही, असा गर्भित इशारा आमदार कुटे यांनी दिला आहे.

दिवसाढवळ्या दगडफेक झाल्याने एकूण कायदा सुव्‍यवस्‍था बुलडाण्यात धोक्‍यात आल्याचेच दिसून येत आहे, असे कुटे म्‍हणाले. हा प्रकार प्रकार घडत असताना परत गेलेल्या चिखलीच्‍या आमदार श्वेताताई महाले, योगेंद्र गोडे, शिंदे, विनोद वाघ हेही मलकापूर रोडवर दाखल झाले. सर्वांनी रस्‍ता अडवल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. घटनास्‍थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया हेही दाखल झाले. त्‍यांनी कुटे आणि भाजपा नेत्‍यांची समजूत काढत कारवाईसाठी वेळ देण्याची विनंती केली. अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, दंगा काबू पथकही घटनास्‍थळी असून, मलकापूर रोडला पोलीस छावणीचे स्‍वरुप सध्या साडेचारच्‍या सुमारास आले आहे. दरम्‍यान, बराच वेळ होऊनही पोलीस कारवाई करत नसल्याचे संतप्‍त झालेल्या आमदार कुटे यांनी जयस्तंभ चौकाकडे पायीच जाण्याचा निर्णय घेतला. पाचच्‍या सुमारास त्‍यांनी सोबतच्‍या नेत्‍यांसह जयस्तंभ चौकाकडे पायी कूच केली. याची माहिती घराकडे परतणाऱ्या कार्यकर्त्यांना मिळताच त्‍यांचीही वाहने परत बुलडाण्याकडे फिरली. त्‍यामुळे पुढे संजय कुटे आणि मागे दोन किलोमीटर लांबपर्यंत वाहनांची रांग लागल्याचे सध्या दिसून येत आहे. पोलीस अधीक्षक श्री. चावरिया हेही पुन्‍हा संजय कुटेंच्‍या भेटीसाठी परतले. मात्र समजूत काढूनही आमदार कुटे आणि नेते ऐकण्याच्‍या मनःस्‍थितीत नाहीत. त्‍यांनी आधी जयस्तंभ चौक आणि नंतर पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले. आमदार कुटेंसह नेतेमंडळी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करत असून, कार्यकर्ते बाहेर थांबलेले आहेत. या ठिकाणी गायकवाडांना अटकेची मागणी केली जात आहे. दरम्‍यान, या संपूर्ण प्रकारामुळे बुलडाण्यात अभूतपूर्व तणाव निर्माण झाला असून, जिल्हाभरातले पोलीस शहरात दाखल झाले आहेत. दुसरीकडे भाजपाचे कार्यकर्तेही मिळेल त्‍या वाहनाने किंवा वाहने घेऊन शहरात दाखल व्‍हायला सुरुवात झाली आहे.

संध्याकाळी साडेसहाला आमदार कुटे तासभर पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून बाहेर पडले. पोलीस अधीक्षकांनी दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आश्वसन दिले. तसेच आमदार गायकवाडांवर कारवाईबाबतही कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्‍यामुळे कुटेंनी आंदोलन स्‍थगित करून बुलडाणा सोडण्याचा निर्णय घेतला. त्‍यांना कडेकोट पोलीस बंदोबस्‍तात जळगाव जामोदला नेऊन सोडण्यात येत आहे. सोबत कार्यकर्त्यांचा मोठा ताफाही आहे. स्‍वतः अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे आमदार कुटेंना सोडायला निघाले आहेत. दरम्‍यान, बुलडाणा शहरात दाखल हाेणाऱ्या कार्यकर्त्यांना जिथे आहात तिथून परतण्याच्‍या सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही वृत्त लिहिपर्यंत सातशे ते आठशे कार्यकर्ते शहरात दाखल झाल्याचे समजते. वरिष्ठ पोलीस सूत्रांच्‍या माहितीनुसार, दगडफेक करणाऱ्यांचे अटकसत्र हाती घेण्यात येणार असून, यात कुणाल गायकवाड यांनाही अटक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

दरम्‍यान, कडेकोट पोलीस बंदोबस्‍तात परतत असतानाही आमदार कुटे यांच्‍या वाहनावर मोताळा येथे पुन्हा हल्ल्याचा प्रयत्‍न झाला. भाजपाचे 40 ते 50 कार्यकर्ते कुटेंच्‍या स्‍वागतासाठी रस्‍त्‍यावर उभे होते. कुटे त्‍यांच्‍यापर्यंत पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांना बोलण्यासाठी वाहनातून उतरले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्‍याचवेळी परिसरात आधीपासून दबा धरून बसलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी कुटेंकडे धाव घेण्याचा प्रयत्‍न केला. मात्र पोलिसांनी त्‍यांना पिटाळून लावले. सव्वासात-साडेसातच्‍या दरम्‍यान ही घटना घडल्‍याचे सांगण्यात येते.

(घटनेचे अपडेट जाणून घेण्यासाठी याच बातमीच्‍या लिंकवर काही वेळाने क्लिक करत राहा..)

परिस्‍थिती आटोक्‍यात ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलानेही तेवढीच तयारी ठेवली होती.  कार्यकर्त्यांपेक्षा दुप्पट पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. कार्यकर्त्यांना न येण्याचे आवाहन करूनही ते एवढ्या मोठ्या संख्येने आल्याचे संजय कुटे यांनी पोलीस अधीक्षकांना भेटून आल्यावर सांगितले. कोरोनाच्‍या स्‍थितीमुळे कार्यकर्त्यांना परत जाण्याचे आवाहन त्‍यांनी केले होते. तरीही बरेच कार्यकर्ते कुटे परत जाईपर्यंत ठाम मांडून होते. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जाताना कुटे यांच्‍यासोबत आमदार सौ. महाले पाटील, माजी आमदार संचेती यांच्‍यासह विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे, विनोद वाघ हेही नेते होते. पोलीस अधीक्षकांना भेटून आल्यावर आमदार संजय कुटे म्‍हणाले, की आमदार गायकवाड यांनी केलेली अश्लील शिविगाळ, विरोधी पक्षनेते, पंतप्रधान यांच्‍यावर खालच्‍या भाषेत केलेली टीका आणि कालपासून एकूणच घडलेल्या घडामोडींवर जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून त्‍यांच्‍याकडे पक्षाचा अभिनिवेश न बाळगता गायकवाडांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली.

भाजपाने संपवला विषय..

भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आमदार संजय कुटे म्‍हणाले, की चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे असतात. 2024 येऊ द्या मग बघू. राज्‍य सरकार स्‍वतःचे नाकर्तेपण झाकण्यासाठी अशा प्रकारचे वाद घडवून आणत आहे. मात्र ही वेळ राजकारणाची नाही. कोरोनाची परिस्‍थिती जिल्ह्यात अत्‍यंत बिकट झाली आहे.  त्‍यामुळे आम्‍ही हा विषय इथेच संपवत आहोत. मी शिविगाळ केली नाही. मी म्‍हटलेले नराधम, मवाली हे शब्‍द कुठल्‍या डिक्‍शनरीत शिविगाळ असतील तर मी माफी मागेल, असे कुटे यांनी सांगून वाद इथेच संपवल्याचे जाहीर केले. गायकवाडांनी चॅलेंज दिल्यानंतर तुम्‍ही बुलडाण्यात येऊन ते स्‍वीकारले का, असे विचारले असता कुटे यांनी चॅलेंज हे बरोबरीतील व्‍यक्‍तीचे स्‍वीकारायचे असते, असे सांगून अधिक बोलणे टाळले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्‍थितीवर भाजपा नेत्‍यांनी चर्चा केल्याचे सांगण्यात आले.

बुलडाण्यात येतानाच कुटेंनी केले होते फेसबुक लाइव्‍ह, त्‍यावर म्‍हणाले होते गायकवाडांनी स्‍वतःचे कॅरेक्‍टर सिद्ध केले…

आमदार संजय कुटे जळगाव जामोदमधून निघाले तेव्‍हा त्‍यांनी फेसबुक लाइव्‍ह केले. त्‍यातून पुन्‍हा एकदा गायकवाडांवर शरसंधान साधले. एवढेच नाही तर राज्‍य सरकारवरही टीका केली. ते म्‍हणाले, की गायकवाडांनी अश्लील शिविगाळ करून लायकी दाखवली. यामुळे कार्यकर्त्यांत संताप आहे. अशा पद्धतीची वर्तणूक कोणत्‍या आमदाराने लेली मी माझ्या आजवरच्‍या राजकीय कारकिर्दीत गेल्या 18 वर्षांत पाहिली नाही. इतिहासातसुद्धा अशा प्रकारे कुणी बोलल्याचे, धमक्या दिल्याचे, अश्लील बोललण्याचे ऐकिवात नाही. एका आमदाराने दुसऱ्या आमदाराच्‍या आईवर शिव्या देणे नाही ही आपली संस्‍कृती नाही.  गायकवाडांनी विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवलं आहे. त्‍यांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्‍यांच्‍याकडून काही वेगळे वागण्याची अपेक्षाही केली जाऊ शकत नाही. ते दुर्दैवाने बुलडाण्यातून निवडून आले आहेत.  मी सर्व स्‍त्रियांना मातासमान मानतो. दुर्दैवाने त्‍यांची आई हयात नाही. त्‍यांनाही माताच मानतो. मारहाण करणे, शिव्या देणे, डोके फोडणे, संतापजनक वक्‍तव्‍ये करून ते आपले कॅरेक्‍टर सिद्ध करत असतात. इथे कुणी षंढ नाही. पण जनतेने आपल्याला ज्‍या कामासाठी निवडून दिले आहे, ते काम आपण केले पाहिजेत. जनतेच्‍या अपेक्षा पूर्ण करणे यात मर्दूमकी असते. ज्‍या पद्धतीने आमदार गायकवाड बोलले ते पाहता हे सर्व राज्‍य सरकारचे तर षडयंत्र नाही ना, याची शंका येते. कोरोना रोखण्यात येत असलेले अपयश, नाकर्तेपणा झाकण्यासाठी सरकारने तर हे सर्व प्‍लांट केले नाही ना, असे वाटतेय.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: