खामगाव (घाटाखाली)मुख्य बातम्या

सकाळीच रडारड, आरडाओरड… शेगावच्या बालाजी फैलमध्ये रहिवाशांचा विरोध मोडित काढत हटवली 50 अतिक्रमणे!

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव विकास आराखड्याच्या आड येणारी 52 अतिक्रमणे काढण्याची मोहीम आज, 22 जानेवारीला सकाळी साडेसातला नगरपरिषदेने हाती घेतली. मदतीला मोठा पोलीस बंदोबस्त होता. अतिक्रमणे काढायला सुरुवात करताच रहिवाशांनी मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू केला. रडारड, आरडाओरड यामुळे वातावरण तणावग्रस्त बनले. मात्र पोलिसांच्या बंदोबस्तापुढे रहिवाशांची हतबलता दिसून आली. यातील 40 अतिक्रमणधारकांना मोबदला दिल्याचा दावा नगरपरिषदेने केला तरी अनेक रहिवाशी मात्र मोबदला मिळाला नसल्याचे बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगत होते. दुपारपर्यंत 50 अतिक्रमणे काढली गेली तर 2 अतिक्रमणे तांत्रिक कारणांंमुळे काढणे थांबवले गेले.


नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके हे नगर परिषद अधिकारी, कर्मचार्‍यांसह तब्बल दीडशे पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचा ताफा घेऊन सकाळी बालाजी फैलमध्ये धडकले. दोन जेसीबी, ट्रॅक्टर, 407 वाहनांसह आलेले हे पथक पाहून रहिवाशांना धास्तावले.
8 मार्च 2009 रोजी 249 कोटी रुपयांचा शेगाव विकास आराखडा मंजूर झाला असून, त्यानंतर आरडी-1 पासून कामाला सुरुवात झाली. 90 टक्के शेगाव विकास आराखड्याचे काम पूर्ण झाले आहे. आज सकाळी आरडी- 14 या बारा मीटरच्या रस्त्यासाठी बालाजी फैलमधील रेल्वे पटरीलगत लागून असलेली अतिक्रमणे काढण्याचे काम नगर परिषद प्रशासनाने सुरू केले. आरडी 14 हा रस्ता रेल्वे पटरीच्या बाजूने लागून आरडी 15 व आरडी 2 ला चार मोरी पुलाजवळ जंक्शन होणार आहे. आरडी दोनपासून भक्त निवास पाचच्या मागेपर्यंत हा रस्ता पूर्ण झालेला आहे.
अतिक्रमण काढण्यास सुरुवात होताच रहिवाशांनी विरोध करायला सुरुवात केली. काही लोकांचे म्हणणे होते की आम्हाला मोबदला मिळाला नाही. काही लोकांच्या तांत्रिक अडचणीसुद्धा यावेळी सांगण्यात येत होते. उपविभागीय अधिकार्‍यांच्या भूसंपादनाच्या नोटीस अतिक्रमणधारकांना प्राप्त झाल्या असून त्यानुसार कारवाई सुरू असल्याचे त्यांना सांगण्यात येत होते. मात्र रहिवाशांचा विरोध सुरूच होता. अखेर विरोध करणार्‍यांना पोलिसांनी बाजूला केले. कागदपत्रांअभावी 12 जण मोबदला उचलू शकले नाहीत. तरीही त्यातील 2 घरे वगळता 40 आणि ही दहा अतिक्रमणे काढण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, पोलीस निरिक्षक श्री. हुड, शेगावचे ठाणेदार संतोष टाले यांच्यासह 16 अधिकार्‍यांसह दीडशे कर्मचारी बंदोबस्ताला होते.

महिलेने दिला आत्महत्येचा इशारा
श्रीमती मनिषा किशोर हुंबे या महिलेने तिला न्याय न मिळाल्यास संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला. साधारण एक वर्षापूर्वी या महिलेचे पती किशोर हुंबे यांचे निधन झाले आहे. तीन लहान मुले व सासूबाई आहे. त्यांचं संपूर्ण घर अतिक्रमणात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अतिक्रमण काढण्यास त्यांचा वाढता विरोध पाहून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: