बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

सातगाव म्हसलाजवळ शेतकर्‍यांनी दोन तास अडवला रस्ता, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा; रात्री आठला आंदोलन मागे

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धुळीमुळे पिकांचे डोळ्यांसमोर नुकसान होत असल्याचे पाहून संतापलेल्या शेतकर्‍यांच्या संयमाचा बांध अखेर आज, 22 जानेवारीला सायंकाळी तुटला आणि त्यांनी सातगाव म्हसला गावाजवळ रस्त्यावर उतरत वाहने अडवायला सुरुवात केली. अघोषित रास्ता रोकोमुळे तब्बल दोन- अडीच तास दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प होती. अखेर दिवसातून तीन-चार वेळा रस्त्यावर पाणी मारण्याचे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिल्याने आंदोलन रात्री आठच्या सुमारास मागे घेण्यात आले. सातगाव म्हसला हे गाव धाड- माहोरा रस्त्यावर आहे.


विदर्भ- मराठवाड्याला जोडणार्‍या बुलडाणा- औरंगाबाद महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या मार्गावरून धावणार्‍या वाहनांमुळे मोठी धूळ उडते. या धुळीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रस्त्याचे काम सुरू असताना नियमितपणे पाणी मारणे गरजेचे आहे. मात्र कंत्राटदाराकडून टाळाटाळ केली जाते. परिणामी धुळीमुळे तूर, हरभरा, करडई पिके हातातून जाऊ लागल्याने चिंताग्रस्त शेतकर्‍यांनी रस्ता रोखला. रस्ता अडवल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. अधिकारी, कंत्राटदाराला बोलावून रस्त्यावर पाणी मारायला लावल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका शेतकर्‍यांनी घेतली. अखेर अधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी येत दिवसातून तीन-चार वेळा पाणी मारले जाईल, असे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेतल्याचे आंदोलनकर्त्यांनी बुलडाणा लाइव्हला कळवले. आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारकांचे हाल झाले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: