बुलडाणा (घाटावर)

साहेब आमची तक्रार घेता की नाही सांगा?; देऊळगाव राजा पोलीस ठाण्यावर वानरांचा मोर्चा, ठाणेदारांनी मग त्‍यांना असे केले ‘मॅनेज’!!

बुलडाणा / देऊळगाव राजा (राजेश कोल्हे : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बातमीच हेडिंग वाचून देऊळगावराजा वासीयांसह सर्वच वाचक चक्रावून गेले असतील, पण तसं काही भलतंच घडलं नसून, जरा आगळंवेगळं घडलं एवढंच… पोलीस स्टेशन म्हणजे कायद्याचे रक्षक आणि कायदे तोडणारे अपराधी, गुन्हेगार यांचे मजेदार मिश्रण असते. देऊळगाव राजा पोलीस स्‍टेशनदेखील याला अपवाद नाही. 15 एप्रिलला या पोलीस स्‍टेशनवर चक्क वानर सेना मोर्चा घेऊन आली होती. एकाएकी एवढ्या मोठ्या संख्येने आलेले मोर्चेकरी पाहून पोलीसही थबकले… पण कर्तव्यदक्ष ठाणेदारांनी त्‍यांना असे काही ‘मॅनेज’ केले की ते ‘कोणत्‍या मागण्या घेऊन इथे आलो होतो का’ हेही ते विसरून गेले असावेत… ठाणेदारांनी त्‍यांच्‍यासाठी पाहुणचाराची व्‍यवस्‍था केली. त्‍यानंतर ही मोर्चेकरी मंडळी पुन्‍हा आल्या पावली निघून गेली…

झाले असे, की संचारबंदी व कडक उन्हामुळे देऊळगाव नगरीतील वाहतूक रोडावलेली होती, ठाणेदार संभाजी पाटील दैनंदिन कामकाज, फेरफटका मारून स्टेशनात विसावलेले. अचानक वानरांची एक टोळी आपलाच इलाका असल्याचा थाटात स्टेशनात घुसली. त्यांच्या म्होरक्याने ठाणेदारांसमोर बस्तान मांडले. जणू काही तो आपली फिर्याद मांडत आहे असे सारे दृश्य होते. इतर मंडळी ठाण्यात बस्तान मांडून बसली, हे मुके जीव भुकेले आणि तहानेने व्याकुळ आहेत हे समजून साहेबांनी मग केळी खाऊ घालून व पाणी पाजून त्यांचा पाहुणचार केला. काही वेळ विसावून या पाहुण्यांनी’ राम राम’ करून ठाणेदारांचा निरोप घेतला…

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: