जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

सिंदखेड राजा न. पा. उपाध्यक्षांविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा नगरपालिका उपाध्यक्षा सौ. नंदा विष्णू मेहेत्रे यांच्‍यावर महाविकास आघाडीच्‍या 15 नगरसेवकांनी अविश्वास दाखवला असून, तसा प्रस्‍ताव 31 मे रोजी दाखल केला आहे. भाजपच्या असलेल्या उपाध्यक्षांना पायउतार करण्यासाठी या नगरसेवकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे सत्ता परिवर्तन अटळ मानले जात आहे.

नगरपालिकेत एकूण 17 नगरसेवक असून, त्‍यात शिवसेनेचे 7, राष्ट्रवादीचे 8, भारतीय जनता पक्षाचे 1 व अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत. मुख्याधिकारी प्रशांत व्‍हटकर यांनी अविश्वास प्रस्‍ताव चर्चा करण्यासाठी दहा दिवसांत आत सभा बोलावली जाईल, असे सांगितले. भीमा पंडित जाधव, राजेश एकनाथ आढाव, सौ. दीपाली योगेश म्‍हस्‍के, भिवसन एकनाथ ठाकरे, बालाजी नारायण मेहेत्रे, सुमन प्रकाश खरात, सौ. ज्‍योती बाळू म्‍हस्‍के, सौ. रूख्मन राधाजी तायडे, चंद्रकला मंजाजी तायडे, गणेश शिवाजी झोरे, राजेश दत्तूआप्पा बोंद्रे, सौ. हजरा काझी शेख, अजीम गफार, बबन साहेबराव म्‍हस्‍के, सौ. सारिका श्याम मेहेत्रे अशी अविश्वास प्रस्‍ताव दाखल करणाऱ्या नगरसेवकांची नावे आहेत. नगरपालिकेत सुद्धा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस याची युती होऊन महाविकास आघाडीला उपाध्यक्ष पद मिळावे यासाठी हे 15 नगरसेवक एकवटले आहेत. सौ. नंदा मेहेत्रे विराजमान होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. याबाबत उपाध्यक्षांचे पती विष्णू मेहेत्रे यांनी सांगितले, की सत्तास्थापन होताच भाजप- शिवसेना फार्म्यूला ठेवला होता. परंतु त्यावर काम झालेले नाही. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला. या अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहे, असे ते म्‍हणाले.

प्रस्‍ताव कशामुळे…
विकासकामांत सहभागी न घेणे, विकासकामांची मुद्दाम तक्रार करणे, इतर सदस्यांना विश्वासात न घेणे, मनमानी कारभार, एकतर्फी निर्णय घेणे आदी कारणे प्रस्‍ताव दाखल करताना नगरसेवकांनी दिली आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: