खामगाव (घाटाखाली)

सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या हातून घडतेय अशी देशसेवा!

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देशावर आपण सर्वच प्रेम करतो; परंतु अनेकांचे देशप्रेम फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टलाच उफाळून येते. त्याव्यतिरिक्त देश, देशाप्रतीची कर्तव्ये याचा विसर त्यांना पडतो. मात्र देशासाठी लढणार्‍या सैनिकांच्या मनात देशभक्ती कायम ओसंडून वाहत असते. मग ते कर्तव्यावर असोत की नसोत. निवृत्त होऊनही त्यांच्यातील देशभक्तीची ज्वाला कायम तेवत असते. सैन्यातून निवृत्त झालेल्या माजी सैनिक पुरुषोत्तम बिलेवार यांची देशभक्ती पाहून ही जाणीव शेगावकरांना होत आहे.

सैन्यातून निवृत्त झाल्यावरही आपल्या हातून देशसेवा घडावी, देशावर प्रेम असणारे युवक तयार करावे यासाठी ते प्रयत्नरत आहेत.पुरुषोत्तम बिलेवार हे 2003 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. बॉम्बे इंजिनिअरिंग पुणे येथून त्यांनी ट्रेनिंग घेऊन आसाम, सिक्किम, जम्मू-श्रीनगर, कुपवाडा, लेह, कारगिल, मुंबई, भूतान, बिनिगुली, नेपाल आदी ठिकाणी त्यांनी सैन्यात सेवा दिली. सेवा दिल्यानंतरही ते थांबले नाहीत. 2019 मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांची देशसेवा सुरूच आहे. सेवेत असतानाच 2014 ला शेगाव येथे समर्थ अकॅडमीची स्थापना त्यांनी केली होती. स्थापना केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या माध्यमातून सैन्याच्या विविध क्षेत्रात नोकरी लागली. रिटायर झाल्यानंतर मागील एक वर्षापासून आपला संपूर्ण वेळ ते अकॅडमी व समाजसेवेकरिता देत आहेत. त्यांच्या सैनिकी कॉलनी माधवनगर शेगाव येथे असलेल्या अकादमीमध्ये राहण्याची -जेवणाची व्यवस्था आहे. लेखी प्रशिक्षण, फिजिकल, भरतीपूर्व प्रशिक्षण इथे दिले जाते. आतापर्यंत एक हजारावर विद्यार्थ्यांना सैन्याच्या विविध क्षेत्रात संधी मिळाली आहे. अकॅडमीमध्ये सैन्यातून निवृत्त झालेले अनुभवी शिक्षक आहेत. सध्या 30 च्या वर विद्यार्थी भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असून भविष्यात संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा व सैन्यात भरती करण्याचा त्यांचा मानस आहे. याचबरोबर कुठलेही शुल्क न घेता ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. समाजसेवेचे कार्य सुद्धा त्यांच्या हातून निरंतर सुरू असते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: