विज्ञान

स्मार्ट टीव्ही उडवू शकतो तुमची झोप!

राजेश-रीमा उच्चभ्रू वस्तीत राहणारे एक जोडपे. लग्नाला दहा वर्षे झाली होती. राजेशला त्याच्याकडे असलेल्या स्मार्ट टीव्हीवर पॉर्न फिल्म्स बघण्याचा वाईट नाद होता. त्यासाठीच त्याने टीव्ही बेडरूममध्ये लावून घेतला होता. पॉर्न फिल्म्स बघण्यासोबत राजेश कधी कधी पॉर्न वेबसाइट्सना सुद्धा टीव्हीवरूनच व्हिजिट करत असे. एकेरात्री अशाच एका साइटवरील व्हिडिओ पाहत असताना त्याला धक्काच बसला. रीमासोबतचे त्याचे खासगी अंतरंग क्षण त्या व्हिडिओत चित्रित झाले होते… राजेशने रीमाला तो व्हिडिओ दाखवला. रीमाला तर रडूच कोसळले. दोघांनाही काय करावे कळत नव्हते. पोलिसांत जावे तर बदनामीची भीती होती. राजेशने हा सर्व प्रकार त्याच्या जवळच्या मित्राला, सुधीरला सांगितला. सुधीरने त्याला सायबर सिक्युरिटी एक्स्पर्टची मदत घेण्यास सांगितले. अंकित देसाई हा सुरतमधील प्रसिद्ध सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट. त्याला भेटून राजेशने सर्व घटना सविस्तर सांगितली. अंकितने सर्वप्रथम राजेशची पूर्ण बेडरूम शोधली. कुठे एखादा स्पाय कॅमेरा असेल अशी त्याला शंका होती, पण काहीच मिळून आले नाही. अंकित विचारात पडून इकडे तिकडे बघत असतानाच त्याची नजर राजेशच्या बेडरूममधील स्मार्ट टीव्हीकडे गेली. राजेशला त्याने स्मार्ट टीव्हीचा वापर कशा कशासाठी करतो, ते सर्व विचारले. टीव्ही सुरू करून त्याच्या सेटिंग्स, हिस्टरी, त्याच्यावरील अ‍ॅप्स हे सगळे तपासले आणि तो एका निष्कर्षाप्रत आला. स्मार्ट टीव्हीवर पॉर्न साइट्स पाहत असताना कुठल्या तरी पॉर्न व्हिडिओची मॅलिशिअस लिंक (मालवेअर असलेली, असल्या साइटवर अशा लिंक्स जास्त असतात) राजेशकडून क्लिक झाली असणार आणि स्मार्ट टीव्हीमध्ये मालवेअरचा शिरकाव झाला. या मालवेअरने त्याच्या कॅमेराचा आणि मायक्रोफोनचा ताबा घेतला आणि बेडरूममधले रेकॉर्डिंग केले. स्मार्ट टीव्ही वायफायद्वारे इंटरनेटला जोडला असल्याने रेकॉर्ड केलेली क्लिप त्या साइटवर अपलोड झाली. हे सर्व स्मार्ट टीव्हीबाबतच नाही तर इंटरनेटला जोडलेल्या कुठल्याही स्मार्ट डिव्हाइसबाबत घडू शकते. मालवेअर एकदा का तुमच्या स्मार्ट डिव्हाईसमध्ये शिरले की ते तुमचा डेटा, कॅमेरा, मायक्रोफोन सगळ्याचा ताबा घेऊन त्याचा गैरवापर करू शकते. अंकितने संबंधित साईटच्या अ‍ॅडमिनशी संपर्क साधून राजेशची क्लिप काढून टाकण्याची विनंती केली. पण त्याअगोदर कोणी ती क्लिप डाऊनलोड करून व्हायरल केली असण्याची शक्यता त्याने राजेशला सांगितली. राजेश – रीमा अजूनही भीती आणि बदनामीच्या सावटाखाली आहेत.

ही खबरदारी बाळगा…

स्मार्ट टीव्ही हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. जसे की सेटिंग्जमध्ये जाऊन त्याचा कॅमेरा आणि मायक्रोफोन जरूर नसताना डिसॅबल करावे किंवा त्यावर काळी टेप चिकटवावी. टीव्हीचे सिस्टम सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करावे. बरेच स्मार्ट टीव्ही अ‍ॅन्टीव्हायरस आणि अ‍ॅन्टीमालवेअर सोबत येतात (जसे सॅमसंगचे स्मार्ट सेक्युरीटी) त्यांचे अ‍ॅन्टीव्हायरस अपडेटेड ठेवावे. फक्त टिव्हीसोबत येणारे अ‍ॅप्स आणि रीमोट कंट्रोलचा वापर करावा. जरुरी नसलेले, माहीत नसलेले थर्ड पार्टी अ‍ॅप्स वापरू नये. सेक्युर्ड वाय-फायचा वापर करावा. मुख्य म्हणजे तुम्ही जर टेक्नोलॉजीशी फारसे परिचित नसाल आणि पारंपरिक टीव्ही तुम्हाला पुरेसा असेल तर स्मार्ट टीव्हीपासून दूर राहणे केव्हाही चांगले.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: