जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

‘स्वाभिमानी’चा महावितरणला 10 हजार व्होल्टचा झटका! अधीक्षक अभियंता कार्यालयाची वीज कापली!! सोक्षमोक्ष होईस्तोवर कार्यालयातच ठिय्या, आम्ही अंधारात तर तुम्ही पण अंधारात: रविकांत तुपकर

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्येवर रोखठोक आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज, 15 मार्चला चक्क महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाची वीज कापून प्रशासनाला 10 हजार व्होल्टचा जबर झटका दिला! यामुळे दुपारपासून जिल्ह्यातील महावितरणचे कामकाज नियंत्रित करणारे चिखली मार्गावरील अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालयच अंधारात असल्याने बुलडाण्यासह जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई बंद होत नाही तोपर्यंत कार्यालयातच ठिय्या मांडण्याचा निर्धार करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या मांडण्यात आला आहे.

अगोदरच चोहोबाजूंनी अडचणीत आलेल्या व आत्महत्यांच्या उंबरठ्यावर असलेल्या हजारो शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा महावितरणने लावला. दस्तुरखुद्द उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कास्तकारांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश दिले. मात्र त्या आदेशाला केराची टोपली दाखवत महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीज कनेक्शन कापण्याचा तुघलकी प्रकार सुरू केला. यामुळे आज 15 मार्चला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी थेट चिखली मार्गावरील अधीक्षक अभियंता कार्यालय गाठले! यानंतर अधीक्षक अभियंत्याना घेराव टाकत आक्रमक भाषेत जाब विचारला. मात्र तत पप  करीत थातुरमातुर उत्तरे दिल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाचा वीज पुरवठा कट करून टाकला!  यावेळी  प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, की शेतकऱ्यांची वीज कापण्यावर आम्ही अतिशय आक्रमक असून हे प्रकार अजिबात सहन करण्यात येणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचे तोडलेले कनेक्शन जोडत नाही तोपर्यंत आम्ही महावितरण सोडणार नाही, असा रोखठोक इशाराही त्यांनी दिला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: