बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

स्व. दयासागरजी महाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केले वृक्षारोपण

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांचे सासरे आणि विद्याधर महाले यांचे वडील दयासागरजी महाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या सावडण्याचा दिवशी वटवृक्ष, रक्तचंदन, पारिजातक, आंबा तसेच इतर वेगवेळी झाडे व फुलझाडांचे रोपण करण्यात आले. श्रीमती पुष्पलता महाले, तिन्ही मुले विद्याधर महाले, मिलिंद महाले, श्रीधर महाले तिन्ही सुना सौ. श्वेताताई महाले, सौ. भाग्यश्री महाले आणि सौ. श्रद्धा महाले यांच्या हाताने रोपांची लागवड करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून तसेच सामाजिक अंतर व आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सॅनिटायझर देऊन स्व. दयासागरजी महाले यांच्या सावडण्याचा घरगुती स्वरूपातच कार्यक्रम करण्यात आला. कोरोनामुळे कुठेही गर्दी होऊ नये या करिता आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील आणि विद्याधर दयासागर महाले यांनी बाबांच्या सावडण्याचा कार्यक्रम महाले परिवारातच होणार असल्याचे व महाले परिवारावर प्रेम करणाऱ्यांनी आहे तेथूनच श्रद्धांजली अर्पण करण्याचे जाहीर आवाहन केले होते. बाबांचा सावडण्याचा कार्यक्रम हा त्यांच्या शेतात असल्याने आलेल्या प्रत्येक व्यक्तीने सामाजिक अंतराचे पालन केले.

वृक्षारोपण करून पर्यावरण जागृती

वृक्षारोपण करून पर्यावरणा विषयी जनजागृती आणि पर्यावरण वाढीचा संदेश यानिमित्ताने महाले परिवाराने दिला आहे. स्व. दयासागरजी महाले जरी आपल्यातून गेले असले तरी लावलेल्या झाडाच्या रूपाने ते सदैव आपल्या सोबत राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी घरातील आनंदाच्या क्षणी तर वृक्षारोपण करावेच परंतु अशा दुःखद प्रसंगी आपल्या स्वकीयांच्या स्मृती निमित्ताने सुद्धा झाडे लावून पर्यावरण जागृती सोबतच एक झाडे लावण्याचा संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे.

तेरवीचा कार्यक्रमही घरगुती स्वरूपातच

महाले परिवार हा तसा खूप मोठा परिवार आहे. त्यामुळे भाऊबंदांसोबत सगेसोयरे व इतर अन्य नातेवाईक तसेच मित्र परिवाराचा लोभही बराच मोठा आहे.सद्यःस्थितीत कोरोनाच्या महामारीत कोणताही कार्यक्रम व्यापक स्वरूपात करणे योग्य तर नाही पण शासकीय नियमांचाही तो भंग ठरणार आहे. महाले परीवारावर प्रेम करणाऱ्या आप्तस्वकीयांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता स्व. बाबांच्या तेरवीचा कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर न करता केवळ घरगुती स्वरूपातच करण्यात येणार आहे. तसेच कोरोना संक्रमणाचा काळ संपताच बाबांच्या वर्ष श्राद्धला खूप मोठा आरोग्य मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तोरणवाडा, उंद्री परिसरात महाले परिवाराने नेहमीच पुरोगामी विचारांचा पुरस्कार केलेला आहे. महाले परिवारातील सदस्यांची नावे बघता नाविन्यपूर्ण कार्य जोपासून आपले अनोखे वेगळेपण सुद्धा त्यांनी कायम ठेवले आहे. महाले परिवार ज्याप्रमाणे राजकारणातील एक मोठे नाव आहे त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात सुद्धा या परिवाराचे मोठे योगदान आहे. राजकारणातील महाले परिवाराची ही तिसरी पिढी. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरपालिका सभापती,  जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेत सुद्धा महिला व बाल कल्याण सभापती आणि आमदार अशी विविध पदे भूषविताना महाले परिवाराने राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: