फॅशनिस्टा

हनिमून काय कराल, कसे राहाल?

हनिमूनच्या दरम्यान शरीरसंबंध घडायलाच हवा, अशी बहुतांश वेळा तरुणांच्या विशेषतः मुलांच्या डोक्यातील कल्पना असते. टीव्ही मालिका, सिनेमा यातील चित्रविचित्र दृश्यांमुळे किंवा मित्रांनी करून दिलेल्या चुकीच्या कल्पनांमुळे अनेकदा मुलांचे हे विचार तयार होत जातात. साधारणपणे आतापर्यंत फुलांनी शृंगारलेला पलंग, चारी बाजूंनी पलंगाभोवती लावलेल्या माळा, हातात दुधाचा ग्लास घेऊन पुढे येणारी नायिका… अशा पद्धतीची दृश्यं सिनेमांमधून दाखवली जातात.

सुहागरातच्या या कल्पना प्रत्यक्षातही खर्‍या ठराव्यात, हा समज यातूनच घडत गेला, तर ते अगदीच चुकीचंही नाही. मात्र, प्रत्यक्षात हनिमूनच्या दरम्यानचा वेळ हा फक्त शरीरसंबंधांसाठीच असतो, हा समजच चुकीचा आहे. कौन्सेलर म्हणतात, दरवेळी फक्त मुलंच दोषी असतात असं नाही, तर मुलींच्याही आधीच्या काही प्रकरणांमुळे त्या नवर्‍याची तुलना प्रत्येक वेळी पूर्वीच्या बॉयफ्रेंडशी करतात. अर्थात, लग्नापूर्वी एखादं तरी अफेअर असणं हे अलीकडे तरुणांच्या बाबतीत फारच नॉर्मल गोष्ट झाली आहे. मात्र, लग्नानंतर हनिमूनच्या दरम्यानचा वेळ हा खर्‍या अर्थाने एकमेकांच्या सहवासात घालवण्यासाठी मिळणारा वेळ असतो. त्यामुळे शाळा, कॉलेजच्या आठवणी, मित्रमैत्रीणी, नातेवाइक, त्यांचे स्वभाव, अगदी घरगुती संबंध असलेल्या व्यक्ती, त्यांच्याशी असलेली नाती आणि अर्थातच एकमेकांच्या आवडीनिवडी, स्वभाववैशिष्ट्यं याविषयी जाणून घेण्यासाठी मिळणार्‍या या वेळाचं सार्थक करायला हवं. हनिमूनहून पुन्हा घरी आल्यानंतर आपण रोजच्या कामांमध्ये अडकणारच असतो. त्यावेळी एकमेकांविषयी जाणून घ्यायला नीटसा वेळ आणि स्वस्थता मिळत नाही. त्यातून रोज खटके उडतात, चिडचिड होते. हे टाळण्यासाठी हनिमून दरम्यानचा वेळ सत्कारणी लावणं आवश्यक आहे.

थोडा वेळ द्यायला हवा

-लव्ह मॅरेजमध्ये फार वेळा हे प्रश्‍न येत नाहीत. मात्र, ठरवून झालेल्या लग्नात हनिमून दरम्यानच्या वेळाविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. त्याच वेळी एकमेकांना योग्य पद्धतीनं सांभाळून घेतलं नाही, तर जोडीदाराच्या स्वभावाविषयीची, वागण्या-बोलण्याविषयीची कायमची अढी मनात बसू शकते. – मुळात एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला काही कारणानं आकर्षण वाटायला हवं, तरच शारीरिक संबंध मनापासून ठेवावेसे वाटू शकतात. जोडीदाराविषयी मनापासून प्रेम वाटल्याशिवाय होणार्‍या शारीरिक संबंधांना काहीच अर्थ नाही; कारण मनं जोडली जाण्याचा तोही एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुलगी पाहाताच क्षणी मुलाला आवडली असेलही; पण मुलगीही मुलाच्या प्रेमात तत्क्षणी पडेल, असं नाही. त्यामुळे अ‍ॅरेंज मॅरेजच्या दरम्यान तरी किमान एकमेकांना समजून घेण्यासाठी काही काळ जाऊ द्यायला हवा. – बर्‍याचदा स्कोअर किती?, बॅटिंग सुरू आहे का रे? यांसारखे मेसेजेस मुलांना सर्रास पाठवले जातात. त्यातून मुलांना प्रोत्साहन मिळत नाही, तर त्यांच्या भावना भडकवल्या जातात. मात्र, शरीरसंबंध ही अतिशय नाजूक भावना असते. तिचा इतक्या उथळ पातळीवर जाऊन केला गेलेला विचार आणि त्यातून घडलेली कृती ही जोडीदाराचं मन कायमचं दुखवण्यासही कारणीभूत ठरू शकते.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: