जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

हा फुटला… त्याला उचलले… सदस्यांची पळवापळवी सुरू! सदस्यांची गाडी येणार डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या समोर

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 9, 10 आणि 11 फेब्रुवारीला गावाचा कारभारी अथवा कारभारीन निवडली जाणार आहे. आपल्याच गटाचा सरपंच व्हावा म्हणून गावपुढार्‍यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे हा फुटला, तो त्यांच्या हाती लागला, याला त्यांनी इतक्यात उचललं, त्यांचं असं ठरलं अशा अफवांना ग्रामीण भागात पेव फुटले आहे.
यंदाची ग्रामपंचायत निवडणूक तशी हटकेच राहिली. 527 पैकी तब्बल 29 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने प्रत्यक्ष 498 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यातही सुरुवातीला काढलेले सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने बराच गोंधळ उडाला होता. त्यामुळे सरपंचपदाची खात्री नसल्याने उमेदवार खर्च करताना संकोच करताना दिसले होते. मात्र आता आरक्षण जाहीर झाल्याने निवडून आलेल्या सदस्यांच्या सोयीसाठी हा राखून ठेवलेला खर्च होताना दिसत आहेत. बहुमताचा आकडा गाठून गावावर वर्चस्व प्रस्थापित केलेल्या पॅनलप्रमुखानी आरक्षण डोळ्यासमोर ठेवून हालचाली गतिमान केल्या आहेत. त्यातही सरपंच पदाचे दावेदार असलेले काही उमेदवार बंडाच्या तयारीत आहेत. बहुमत गाठलेल्या पॅनलमधून संधी मिळत नसेल तर काही जणांना सोबत घेऊन विरोधी पॅनेलमध्ये जाऊन का होईना मात्र सरपंच पद मिळवायचेच, असा चंग अनेकांनी बांधला आहे. अल्पमतात असलेले पॅनलप्रमुख बहुमत असलेल्या पॅनलमधील काही सदस्य गळाला लागतील का यासाठी रणनीती तयार करत आहे. गळाला लावण्यासाठी पद देणे किंवा लक्ष्मीदर्शन असे अमिष दाखवण्यात येत आहे. बहुमताचा आकडा गाठून काठावर पास झालेल्या पॅनल प्रमुखांची धाकधूक आता वाढली आहे. सदस्यांची पळवापळवी होण्याची शक्यता गृहीत धरून काही ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सदस्यांना सहलीवर नेण्यात आले आहे.
गाडी थेट ग्रामपंचायतीच्या समोर
सदस्य फुटाफुटीचा अथवा पळवापळवीचा संभाव्य धोका ओळखून काठावर बहुमत गाठलेल्या सदस्यांना पॅनल प्रमुखांनी सहलीवर पाठवले आहे. गोवा, कोकण तर काहींनी थेट तिरुपती गाठले आहे. सहल उरकून या सदस्यांना सरपंच पदाच्या निवडणुकीच्या दिवशी दुपारी 2 ला पाच मिनिटे कमी असताना आणले जाणार आहे. निवडणूक प्रकिया सुरू होण्याच्या 5 मिनिटे अगोदर या सदस्यांची गाडी थेट ग्रामपंचायतीच्या समोर आणण्यात येणार असल्याचे पॅनल प्रमुखांकडून सांगण्यात येत आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: