क्राईम डायरीमुख्य बातम्या

हॉटेल राधेयमधून ग्राहकाची 65 ग्रॅमची सोनसाखळी चोरीला; मॅनेजरसह 2 कामगारांवर संशय

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः चिखली रोडवरील हॉटेल राधेयमधून ग्राहकाची 65 ग्रॅमची सोनसाखळी चोरीला गेली आहे. हॉटेलमालकासह मॅनेजरने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्राहकाने थेट बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी मॅनेजरसह 2 कामगारांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
मॅनेजर किशोर काटकर व कर्मचारी सुमित तळणीकर, सुशिला इंगळे अशी गुन्‍हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अमरावती येथून पाराशर बुलबुले हे बुलडाण्यात समाज कल्याण विभागाच्‍या कार्यालयात कामानिमित्त आले होते. कार्यालयात विलंब झाल्याने त्‍यांनी जवळच असलेल्या चिखली रोडवरील हॉटेल राधेयमध्ये मुक्‍काम केला. रात्री झोपताना त्‍यांनी आपली चैन काढून उशीखाली ठेवली. सकाळी उठल्‍यानंतर उशीखाली ठेवलेली सोनसाखळी ते विसरले आणि तसेच अमरावतीला निघून गेले. प्रवासात त्‍यांना सोनसाखळी बुलडाण्यातच राहिल्याचे लक्षात आले. त्‍यांनी अमरावतीला गेल्यानंतर हॉटेलच्‍या क्रमांकावर फोन करून हा प्रकार सांगितला. यावेळी हॉटेलमधील कर्मचारी सुमित तळणीकर याने त्‍यांना रात्रीपासून रूममध्ये कुणीच गेले नसून, साफसफाईसुद्धा केली नसल्याचे सांगून रूम तपासून सांगतो, असे सांगितले. त्‍यानंतर रूममध्ये जाऊन येऊन तिथे सोनसाखळी मिळाली नसल्याचे त्‍याने बुलबुले यांना सांगितले. अमरावती येथून बुलबुले बुलडाण्यात आले. त्‍यांनी हॉटेल राधेय गाठून मॅनेजर किशोर काटकर यांची भेट घेतली. रात्री ग्राहक आल्यानंतर त्‍या रूममध्ये सुमित तळणीकर व सुशिला इंगळे गेले होते, असे मॅनेजरने सांगितले. मात्र सर्वच जण उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने बुलबुले यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीत मॅनेजर आणि 2 कर्मचाऱ्यांवर संशय व्‍यक्‍त केल्‍यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: