क्राईम डायरीमुख्य बातम्या

३ हजारांची लाच घेताना बुलडाणा शहरचा पोलीस हेडकॉन्स्टेबल जाळ्यात!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तक्रारदाराच्या भाच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या जमादाराला रंगेहात अटक करण्यात आली आहे. वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज, २ जुलैला सायंकाळी ५ च्या सुमारास ही कारवाई केली. शिवाजी कुंडलिक मोरे (५४) असे या लाचखोर जमादाराचे नाव आहे.

इंदिरानगरात राहणाऱ्या ३० वर्षीय युवकाने मोरे लाच मागत असल्याची तक्रार वाशिमच्या “एसीबी’कडे केली होती. तक्रारकर्त्याच्या भाच्याविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाचखोर जमादार मोरे याने ५ हजार रुपये मागितले होते. मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी ही माहिती “एसीबी’ला दिली. आज सायंकाळी ५ च्या सुमारास मोरे याने ३ हजार रुपये घेऊन तक्रारदाराला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ बोलावले होते.

“एसीबी’ने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी ३ हजार रुपयांची लाच घेताना तो अलगद जाळ्यात अडकला. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती. कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यातच स्वतःवर गुन्हा दाखल होण्याची नामुष्की लाचखोरीमुळे जमादारावर ओढवली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीचे अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्‍या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिमचे पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. शेळके, पोलीस निरीक्षक एन. बी. बोराडे, पोहेकाँ नितीन टवलारकर, पो.ना. अरविंद राठोड, योगेश खोटे, चालक शेख नावेद यांनी केली.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: