अंगावरील दागिने ओरबाडले, कानाचे लचके तोडले, नंतर केली महिलेची हत्‍या!; लोणार तालुक्‍यातील अंगावर शहारे आणणारी घटना

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंगावरील दागिने अक्षरशः ओरबाडले. त्यासाठी कानाचे लचके तोडले. त्यानंतर वृद्ध महिलेची हत्या केली. ही खळबळजनक तितकीच अंगावर शहारे आणणारी घटना भुमराळा (ता. लोणार) शिवारात काल, १८ सप्टेंबरला समोर आली आहे. तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली असून, लवकर आरोपींचा शोध घेतला जाईल, असे ठाणेदार एल. डी. तावरे यांनी …
 
अंगावरील दागिने ओरबाडले, कानाचे लचके तोडले, नंतर केली महिलेची हत्‍या!; लोणार तालुक्‍यातील अंगावर शहारे आणणारी घटना

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंगावरील दागिने अक्षरशः ओरबाडले. त्‍यासाठी कानाचे लचके तोडले. त्‍यानंतर वृद्ध महिलेची हत्‍या केली. ही खळबळजनक तितकीच अंगावर शहारे आणणारी घटना भुमराळा (ता. लोणार) शिवारात काल, १८ सप्‍टेंबरला समोर आली आहे. तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली असून, लवकर आरोपींचा शोध घेतला जाईल, असे ठाणेदार एल. डी. तावरे यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले.

कासाबाई नारायण चौधरी (६५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्‍या शेतात कामासाठी सकाळी ११ वाजता गेल्या होत्या. संध्याकाळी सहापर्यंत परत न आल्याने घरच्यांनी शोध सुरू केला. काही नातेवाइक शेतात शोधत असताना कासाबाई कपाशीचे शेतात तुरीच्या पिकात मृतावस्थेत आढळल्या. त्‍यांच्‍या अंगावरील दागिने चोरट्यांनी अक्षरशः ओरबडून व कानाचे लचके तोडून बळजबरीने नेले असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. तशा खुणा शरीरावर आढळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्‍यांच्या अंगावरील कानातील सोन्याचे रिंग पाच ग्रॅमची, कानातील सोन्याची फुले एक ग्रॅमचे, हातातील चांदीचे कडे, पाटल्या बत्तीस तोळे, मंगळसूत्र पोत चार ग्रॅमची असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले.

घटनेची तक्रार कासाबाईंचा नातू मधुकर दत्ता मोरे याने १९ सप्टेंबर रोजी बिबी पोलीस स्टेशनमध्ये केली. माहिती मिळताच ठाणेदार एल. डी. तावरे यांनी कर्मचारी दिनेश चव्हाण, अरुण सानप, अर्जुन सांगळे, यशवंत जैवळ यांच्‍यासह घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करून अज्ञात खुन्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी बिबी आरोग्‍य केंद्रात करण्यात आली. आज, १९ सप्‍टेंबरला जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट दिली. एलसीबीप्रमुख बळीराम गीते हेही पथकासह अाले होते. श्वानपथक, ठसे तज्‍ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. या अगोदरही भुमराळा येथे चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र चोरट्यांना पोलिसांची भितीच राहिली नसून, चोरट्यांची हिंमत वाढली आहे. पोलिसांनी आता ॲक्शन मोडवर यावे, अशी चर्चा सामान्य जनतेत सुरू आहे.