अंत्रजमध्ये दीडशे पोलिसांचा भल्‍या पहाटे हल्लाबोल; गुन्‍हेगारांना ना पळता आले, ना प्रत्‍युत्तर देता आले… 31 लाख रुपयांचे घबाड जप्‍त!

बुलडाणा (मनोज सांगळे/कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अर्धा किलो सोन्याच्या गिन्न्या 20 लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखवून पुण्याहून तिघांना अंत्रज (ता. खामगाव) येथे बोलावून घेतले. तिघांनी 15 लाख रुपये आणले, उर्वरित 5 लाख रुपये नंतर देण्याचे ठरले. मात्र पैसे ताब्यात घेताच 25 ते 30 जणांनी या तिघांवर हल्ला चढवला. यात बेदम मार खाल्ल्यानंतर …
 

बुलडाणा (मनोज सांगळे/कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अर्धा किलो सोन्‍याच्‍या गिन्न्या 20 लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखवून पुण्याहून तिघांना अंत्रज (ता. खामगाव) येथे बोलावून घेतले. तिघांनी 15 लाख रुपये आणले, उर्वरित 5 लाख रुपये नंतर देण्याचे ठरले. मात्र पैसे ताब्‍यात घेताच 25 ते 30 जणांनी या तिघांवर हल्ला चढवला. यात बेदम मार खाल्ल्यानंतर तिघांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वारंवार अशा स्‍वरुपाच्‍या घटना समोर येत असल्याने आरोपींना पकडण्यासाठी कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्‍या नेतृत्त्वाखाली विशेष मोहीम आखण्यात आली. आज, 6 मे रोजी पहाटे पाचच्‍या सुमारास सुमारे दीडशे पोलिसांनी एकाचवेळी या वस्‍तीवर हल्लाबोल केला. 25 ते 30 जणांना ताब्‍यात घेण्यात आले आहे. त्‍यांच्‍याकडून मोठे घबाड जप्‍त करण्यात आले असून, सुमारे 31 लाख रुपयांची ही मोठी कारवाई आहे.

या प्रकरणात काल, 5 मे रोजी अनिल सुरेंद्र जाट (25, रा. पुणे) यांनी खामगाव ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली होती.  जाट हे सोन्‍याच्‍या गिन्न्या अर्ध्या किंमतीत घेण्यासाठी आपल्या अन्य दोन साथीदारांसह अंत्रजला आले होते. मात्र पैसे ताब्‍यात येताच त्‍यांच्‍यावर हल्ला चढवण्यात आला होता. यापूर्वीही अशाच स्‍वरुपाच्‍या तीन घटना अंत्रजमध्येच घडल्‍या आहेत. मात्र दरवेळी एकतर आरोपी पसार होतात किंवा कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ले करण्यात येतात. यात आरोपींच्‍या महिलाही अग्रस्‍थानी असतात. त्‍यामुळे यावेळी कारवाई करताना विशेष दक्षता घेण्यात आली. त्‍यासाठी मोहीम आखण्यात आली. कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी या मोहिमेचे नेतृत्त्व केले.

पहाटे पाचलाच सुमारे दीडशे पोलिसांचा ताफा अंत्रजमध्ये धडकला. गुन्‍हेगारांच्‍या वस्‍तीवर एकाचवेळी हल्लाबोल करण्यात आला. त्‍यामुळे गुन्‍हेगारांना ना पळून जाण्यास वेळ मिळाला, ना प्रत्‍युत्तर देणे शक्‍य झाले. पोलिसांनी जवळपास 25-30 जणांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या आहेत. त्‍यांच्‍या ताब्‍यातून नगदी २६ लाख 4 हजार 450 रुपये, पिवळ्या धातूच्या गिन्न्या (अंदाजे किंमत 1800 रुपये), पांढऱ्या धातूचे दागिने (किंमत 1 लाख रुपये), सोन्याचे दागिने (किंमत 3 लाख रुपये), 26 मोबाइल (किंमत 70 हजार रुपये), देशी बनावटीचे 2 पिस्तूल, 6 राऊंड (किंमत 59000 रुपये), दोन तलवारी (किंमत 2 हजार रुपये), लोखंडी धारदार सुरे (किमत 3 हजार रुपये), टोकदार भाले, कुऱ्हाड (किंमत 2 हजार चारशे रुपये), टेक्‍स्मो मोटर (किंमत रुपये 21000) असा एकूण 31 लाख 79 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. या कारवाईसाठी खामगाव ग्रामीण, खामगाव शहर, शिवाजीनगर, शेगाव शहर व ग्रामीण, हिवरखेड पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. ग्रामीणचे ठाणेदार रफीक शेख, शहरचे ठाणेदार सुनिल अंबुलकर, शिवाजीनगरचे ठाणेदार सुनिल हुड, शेगाव शहरचे ठाणेदार संतोष टाले, हिवरखेडचे ठाणेदार प्रविण तळी, शेगाव ग्रामीणचे ठाणेदार गोकूळ सूर्यवंशी यांच्‍यासह सर्व पोलीस उपनिरिक्षक, कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ही कारवाई केली.