अंत्‍यसंस्‍कारावरून कनारखेडमध्ये हाय होल्‍टेज ड्रामा… ग्रामपंचायतीसमोरच पेटवणार होते मृतदेह!; अधिकाऱ्यांची पळापळ

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने अंत्यसंस्कार करायचे कुठे, हा प्रश्न कनारखेड (ता. शेगाव) येथील ग्रामस्थांना कायम भेडसावत आला आहे. मात्र ग्रामपंचायतीने आजवर याची गंभीरतेने दखल घेतली नाही. काल, २५ ऑगस्टला निधन झालेल्या वृद्धेवर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. आज, २६ ऑगस्टला अंत्यसंस्कार करायचे होते. त्यामुळे जागेवरून पुन्हा नातेवाइकांनी संताप व्यक्त …
 
अंत्‍यसंस्‍कारावरून कनारखेडमध्ये हाय होल्‍टेज ड्रामा… ग्रामपंचायतीसमोरच पेटवणार होते मृतदेह!; अधिकाऱ्यांची पळापळ

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्‍मशानभूमीसाठी जागा नसल्याने अंत्‍यसंस्‍कार करायचे कुठे, हा प्रश्न कनारखेड (ता. शेगाव) येथील ग्रामस्‍थांना कायम भेडसावत आला आहे. मात्र ग्रामपंचायतीने आजवर याची गंभीरतेने दखल घेतली नाही. काल, २५ ऑगस्‍टला निधन झालेल्या वृद्धेवर अंत्‍यसंस्‍काराचा प्रश्न निर्माण झाला. आज, २६ ऑगस्‍टला अंत्‍यसंस्‍कार करायचे होते. त्‍यामुळे जागेवरून पुन्‍हा नातेवाइकांनी संताप व्‍यक्‍त केला. नातेवाइकांनी चक्‍क ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्‍यसंस्‍कार करण्याचा निर्णय घेतला. लाकडेही ग्रामपंचायतीसमोर नेऊन टाकली. मात्र तहसील प्रशासनाने हस्‍तक्षेप करून जागा सूचवायला सांगून ती जागा लगेच स्‍मशानभूमीसाठी उपलब्‍ध करून देऊ, असे आश्वासन दिले. त्‍यामुळे गावाशेजारील नदीकिनारी अंत्‍यसंस्‍कार पार पडले. सकाळपासून दुपारपर्यंत चाललेल्या या हाय होल्‍टेज ड्राम्याने अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच पळापळ झाली तर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्‍या तोंडचे पाणी पळाले होते…!

कनारखेडमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्‍ध करून देण्याची जुनी मागणी आहे. ग्रामसेवकाने जागा नाही अन्‌ निधीही नाही, असे जाहीर करून ग्रामस्‍थांच्‍या जखमेवर यापूर्वीच मीठ चोळले असल्याचे ग्रामस्‍थांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्‍यापासून तर अगदी जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि थेट पालकमंत्री आणि आमदार-खासदारांपर्यंत निवेदन दिली. स्‍मशानभूमीसाठी जागा उपलब्‍ध करून देण्यासाठी साकडे घातले. मात्र दखल घेतली गेली नाही, असा ग्रामस्‍थांचा आरोप आहे. गायगाव बुद्रूक, गायगाव खुर्द व कनारखेड अशा तीन गावांची ही गट ग्रामपंचायत आहे. सरपंच शारदा दिलीप पवार असून, त्‍यांचे पती पुण्यात कंपनीत कामाला असल्याने त्‍याही पुण्यात राहतात. ग्रामपंचायतीच्‍या बैठकांना हजेरी लावतात. बाकी सर्व कारभार त्‍यांचे दीर संतोष दयाराम पवार सांभाळतात. यामुळेही गावातील विकासकामांवर परिणाम झालेला आहे. गट ग्रामपंचायतीने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ठराव घेतला आहे. मात्र पुढे काहीच हालचाली झालेल्या नाहीत.

काल रात्री चंद्रभागाबाई मारोती वाकोडे यांचे निधन झाले. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे गावालगतच्या शेतात पिके उभी आहेत. त्यामुळे अंत्यविधीसाठी जागा नाही. वारंवार मागणी करूनही स्‍मशानभूमीसाठी जागा उपलब्ध न झाल्याने ग्रामस्‍थांत खदखद होतीच. ती या घटनेमुळे बाहेर पडली. वृद्धेच्‍या नातेवाइकांसह ग्रामस्‍थांनी अंत्‍यसंस्‍कार थेट ग्रामपंचायतीसमोरच करण्याचा निर्णय घेतला. तशी तयारीही सुरू केली. बैलगाडीतून तिथे लाकडेही नेऊन टाकली. त्‍यांच्‍या या पवित्र्यामुळे अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली. निवासी नायब तहसीलदार डॉ. सागर भागवत यांनी कनारखेड गाठले. ग्रामसेवक सुभाष दुबे, तलाठी श्री. मोहोड, उपसरपंच विश्वास सोनवणे यांच्‍यासोबत नातेवाइक आणि ग्रामस्‍थांची समजूत घातली. ग्रामपंचायतीने ठराव घेऊन प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांकडे द्यावा. सरकारी जागा असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देऊन मान्यता घेण्यात येईल. खासगी जागा असल्यास अधिग्रहणासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देण्यात येईल. प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. भागवत यांनी दिले. त्‍यानंतर नातेवाइक व ग्रामस्‍थ शांत झाले. त्‍यांनी गावाशेजारील नदीकाठी अंत्‍यसंस्‍काराचा निर्णय घेऊन अंत्‍यविधी उरकले. यावेळी गुलाबराव वाकोडे, सिद्धार्थ वाकोडे, बाबुराव वाकोडे, दिलीप वाकोडे, सामाजिक कार्यकर्ते दीपक निळे, विश्वास निळे, विनोद निळे, विनोद सुलतान आदींची उपस्‍थिती होती.