…अखेर मतदार यादीवर वगळणीची कुऱ्हाड कोसळलीच! बुलडाणा तालुक्यातील १४ हजारांवर मतदारांची नावे “कट’!!

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मतदार व राजकारण्यांनी गांभिर्याने न घेतल्याने अखेर बुलडाणा तालुक्यातील १४ हजार २८८ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. येत्या काही दिवसांतच उर्वरित नावेदेखील कट करण्यात येणार आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, याचे परिणाम येत्या निवडणुकांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. मागील अनेक महिन्यांपासून वगळणीपूर्व प्रक्रिया …
 
…अखेर मतदार यादीवर वगळणीची कुऱ्हाड कोसळलीच! बुलडाणा तालुक्यातील १४ हजारांवर मतदारांची नावे “कट’!!

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मतदार व राजकारण्यांनी गांभिर्याने न घेतल्याने अखेर बुलडाणा तालुक्यातील १४ हजार २८८ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. येत्या काही दिवसांतच उर्वरित नावेदेखील कट करण्यात येणार आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, याचे परिणाम येत्या निवडणुकांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

मागील अनेक महिन्यांपासून वगळणीपूर्व प्रक्रिया सुरू आहे. संबंधित बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी तहसीलला अहवाल सादर केला. यात हजारो मतदार दिलेल्या निवासी पत्त्यावर राहतच नसल्याचे व मतदार यादीत त्यांचे फोटो नसल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. बुलडाणा तालुक्यातील अशा मतदारांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १७ हजार ४७ इतकी असल्याचे समोर आल्यावर मतदारांना आपले फोटो बीएलओ वा तहसील कार्यालयाकडे सादर करण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले. या मतदारांच्या याद्या ग्रामपंचायत व तहसीलमध्ये लावण्यात आल्या. सर्व राजकीय नेत्यांना याची लेखी सूचना देण्यात आली.

मात्र तरीही अंतिम मुदतीत जेमतेम १०० जणांनी फोटो जमा केले. यामुळे आयोग व वरिष्ठांच्‍या मार्गदर्शनात एसडीओ राजेश्वर हांडे व तहसीलदार रुपेश खंडारे यांनी अखेर अशा मतदारांची नावे वगळण्याची मोहीम हाती घेतली. दरम्यान यासंदर्भात संपर्क साधला असता, आजअखेर तब्बल १४ हजार २८४ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली असल्याचे तहसीलदार रुपेश खंडारे यांनी सांगितले. यात बुलडाणा तालुका व मतदारसंघातील १३ हजार ३१० पैकी १२ हजार ६० मतदारांचा समावेश आहे. तसेच बुलडाणा तालुका परंतु चिखली विधानसभा मतदारसंघात समाविष्ट मतदारांची संख्या ३७३७ इतकी असून, त्यातील २२२४ नावे आजअखेर वगळली आहेत. उर्वरित नावे येत्या काही दिवसांत वगळण्यात येणार असल्याचे तहसीलदार खंडारे यांनी स्पष्ट केले.

मोताळ्यातही कार्यवाही
दरम्यान, मोताळा तालुक्यातील अशा मतदारांची संख्या ५१६० असून, त्यातील ४४८१ जणांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे निवडणूक विभाग सूत्रांनी सांगितले.