अखेर मेहकरच्या प्रतिष्ठित व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

धाडमधील व्यापाऱ्याच्या आत्महत्येचे प्रकरण; आरोपी मात्र फरार बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धाड (ता. बुलडाणा) येथील प्रतिष्ठित व्यापारी कुंडलिक जाधव यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना 22 मे रोजी समोर आली होती. पोलीस तपासात कुंडलिक जाधव यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली होती. त्यात मेहकरच्या व्यापाऱ्याचे नाव असल्याचे समोर आले होते. अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी …
 

धाडमधील व्यापाऱ्याच्या आत्महत्येचे प्रकरण; आरोपी मात्र फरार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः धाड (ता. बुलडाणा) येथील प्रतिष्ठित व्यापारी कुंडलिक जाधव यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना 22 मे रोजी समोर आली होती. पोलीस तपासात कुंडलिक जाधव यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली होती. त्यात मेहकरच्या व्यापाऱ्याचे नाव असल्याचे समोर आले होते. अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन बोडखे (50) असे संशयिताचे नाव असून, तो आरोपी फरार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

कुंडलिक देवराव जाधव (52, रा. धाड) यांचे धाडमध्ये शेतीउपयोगी अवजारे व साहित्य विक्रीचे दुकान आहे. ते पत्‍नी आणि दोन मुलांसह धाडमधील गजानननगरात राहतात. त्यांनी 22 मे रोजी सकाळी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस तपासात जाधव यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत मेहकर येथील एका व्यापाऱ्याला त्यांनी पाच लाख रुपयांचे थ्रेशर मशीन उधारीत दिले होते.पैशांची वारंवार मागणी करूनही संबंधित व्यापाऱ्याने जाधव यांचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे आर्थिक संकट ओढवले त्यामुळेच जाधव यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र याप्रकरणी धाड पोलीस ठाण्यात केवळ आकस्मिक मृत्‍यूची नोंद झाल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. विशेष म्हणजे याप्रकरणातील आरोपी असलेला मेहकरचा व्यवसायिक हा जिल्ह्यातल्या एका बड्या नेत्याच्या जवळचा असल्याचे कळते. त्यामुळेच गुन्हा दाखल व्हायला उशीर झाल्याचे कळते.