अडीच लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग ट्रॅव्हल बसमधून चोरट्यांनी लांबवली; नांदुर्‍यातील खळबळजनक घटना; तीनच दिवसांत दुुसरी घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रवाशाची अडीच लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग चोरट्यांनी लांबवल्याची घटना नांदुरा नजिकच्या आशीर्वाद धाब्यावर 11 जानेवारीला रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणात आज तक्रार देण्यात आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच आठवड्यात अशा स्वरुपाची ही दुसरी घटना असून, यापूर्वी एका महिलेचे लाख रुपयांचे दागिने असलेली …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रवाशाची अडीच लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग चोरट्यांनी लांबवल्याची घटना नांदुरा नजिकच्या आशीर्वाद धाब्यावर 11 जानेवारीला रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणात आज तक्रार देण्यात आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच आठवड्यात अशा स्वरुपाची ही दुसरी घटना असून, यापूर्वी एका महिलेचे लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग लंपास करण्यात आल्याची घटना 9 जानेवारीला घडली होती. तीनच दिवसांत दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लग्नसराईतील उत्साह पुन्हा दिसून येऊ लागला आहे. मात्र अजूनही पूर्णपणे रेल्वे सुरू न झाल्याने खासगी बसने प्रवास करावा लागतो. सचिन विठ्ठलराव राजहंस (34, रा. पाटोदा जि. बीड ह. मु. अंकलेश्‍वर, गुजरात) खासगी कामानिमित्त गुजरात येथे जाण्यासाठी प्रवास करत होते. 11 जानेवारी रात्री 10.30 वाजता महेंद्र ट्रॅव्हल्सची बस (जीजे 05 बीटी 9696) आशीर्वाद धाब्यावर पोहोचली. त्यांच्या 22 नंबरच्या सीटवर त्यांनी बॅग ठेवली होती. ते बॅग सीटवर ठेऊन बाथरूमला गेले असता परत आले तर बॅग तिथे दिसून आली नाही. या बॅगमध्ये 4 तोळे सोन्याची पोत (किंमत 1 लाख 33 हजार 811 रुपये), सोन्याचे मंगळसूत्र 7 ग्रॅम (किंमत 23 हजार 445), सोन्याचा चपला हार 24 ग्रॅमचा (किंमत 78 हजार 885) डोरले, मनी व अंगठी 8 ग्रॅम (किंमत 24 हजार 960 रुपये) एकूण 8 तोळे दागिने व कागदपत्रे एसएससी, एचएससीच्या प्रमाणपत्रे, जन्म तारखेचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाइड सर्टिफिकेट, तसेच मुलीचे जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र, कंपनीचे नेमणूक आदेशासहित महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरट्यांनी चोरून नेली. सचिन राजहंस यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महिलेलाही मिळाला होता चोरीचा आशीर्वाद!

9 जानेवारीला सकाळी जुन्या बसस्थानकावरून वाय एस खासगी बसने मलकापूरला निघालेल्या सौ. भाग्यश्री विशाल पेठकर (24, रा. इंदौर) यांची 1 लाख 19 हजार 620 रुपयांचे दागिने असलेली बॅगही चोरट्यांनी लांबवली होती. आशीर्वाद हॉटेलजवळ बस आली असता त्यांना बॅग लंपास झाल्याचे कळले. त्यांनी बसचे कंडक्टर व नवीन बसस्थानकावर उतरलेल्या चार अनोळखी महिलांवर संशय व्यक्त केला होता.