Update : आता सर्वच दुकाने उघडा 7 ते 4!; वाचा सविस्तर आदेश…

जिल्ह्यात बरेच निर्बंध शिथील; काही कायम; सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्वनोंदणी पद्धतीने 50 टक्के क्षमतेसह सुरू होणारबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आता बरेच निर्बंध शिथील करण्यात आले असून, आता सर्वच दुकाने सकाळी 7 ते 4 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तसेच सलून, स्पा, ब्युटी पार्लरही पूर्वनोंदणी पद्धतीने 50 टक्के क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी मिळाली …
 
Update : आता सर्वच दुकाने उघडा 7 ते 4!; वाचा सविस्तर आदेश…

जिल्ह्यात बरेच निर्बंध शिथील; काही कायम; सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्वनोंदणी पद्धतीने 50 टक्के क्षमतेसह सुरू होणार
बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः
जिल्ह्यात आता बरेच निर्बंध शिथील करण्यात आले असून, आता सर्वच दुकाने सकाळी 7 ते 4 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तसेच सलून, स्पा, ब्युटी पार्लरही पूर्वनोंदणी पद्धतीने 50 टक्के क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. त्‍यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात 1 जून रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 15 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. त्‍यानंतर मुख्य सचिवांच्‍या ४ जूनच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पॉझीटिव्हिटी रेट, ऑक्सिजन बेडची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात श्रेणी निश्चित केल्या असून, श्रेणीनुसार जिल्हा श्रेणी ३ मध्ये समाविष्ट आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती त्यांनी 7 जून रोजी सकाळी 7 वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत काही निर्बंधांसह बरीचशी सूट दिली आहे. नव्या आदेशानुसार सर्व किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, मिठाई दुकाने, खाद्य पेय विक्री दुकाने, पिठाची गिरणी, तसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थांची दुकाने (चिकन, मटन, पॉल्ट्री, मासे आणि अंडी दुकाने), पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने, तसेच दूध व दूग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी) आदी दुकाने, कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने, कृषि प्रक्रिया, उद्योग गृहे, शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी निगडीत दुकाने, ५० टक्के आसन क्षमतेसह शिव भोजन केंद्र दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवा अंतर्गत येत असलेली दुकाने, प्रतिष्ठाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. ही दुकाने शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील. मॉल्स, चित्रपटगृहे पूर्णतः बंद राहतील.

हॉटेल्स, रेस्टॉरंट व खानावळ 50 टक्के आसन क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार तसेच अन्य दिवशी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत केवळ घरपोच सेवेला परवानगी राहील. सार्वजनिक ठिकाणे, खुले मैदान, फिरणे व सायकलिंग साठी सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत परवानगी असेल. सर्व प्रकारची खासगी कार्यालये दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये एकूण उपस्थिती क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील. रोज सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत खेळांना परवानगी असेल. सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम स्थानिक प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीने व 50 टक्के क्षमतेसह घेण्यास परवानगी असेल. असे कार्यक्रम शनिवार व रविवार बंद असतील.

सर्व केशकर्तनालये,सलुन, स्पा, ब्युटी पार्लर एकूण क्षमतेच्या 50 टक्के पूर्व नोंदणीसह सुरू राहतील. वातानुकूलित सेवेस परवानगी नाही. लग्न समारंभ बँड पथक, कॅटरिंग आदींसह पूर्व परवानगीने 50 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. अंत्यसंस्काराला 20 व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी असेल. सभा, बैठका आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीमध्ये घेता येतील. बांधकामावर जर बाहेरून मजूर असतील तर दुपारी 4 वाजेपर्यंत करता येतील. ई कॉमर्स व वस्तू सेवा नियमितपणे सुरू राहतील. सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेसह सुरू राहील. मात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील. जास्तीत जास्त तीन व्यक्तींच्या परवानगीसह मालवाहतूक नियमितपणे सुरू राहील. आंतर जिल्हा व जिल्ह्याबाहेर प्रवाशी वाहतूक सुरू राहील. मात्र स्तर 5 मधील जिल्ह्यात जाणे येणे होत असल्यास ई पास आवश्यक राहील.

सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशु चिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरू राहतील. सर्व प्रकारचे सहकारी संस्था, खासगी व शासकीय बँका, विमा व वैद्यकीय सेवा कंपन्या, नॉन बँकिंग वित्तीय संस्था सुरू राहतील. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील. तसेच सायंकाळी 5 नंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. या कालावधीत नागरिकांना मुक्त संचार करण्यास मनाई राहील. सर्व नागरिक, आस्थापना, दुकाने यांनी मास्क असणे, हात सॅनीटाईज करणे आणि सामाजिक अंतर राखणे या कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था, संघटना यांच्‍यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे.