अनाथ आदित्य अन्‌ गायत्रीचा विवेकानंद आश्रम करणार सांभाळ!

हिवरा आश्रम (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पदरात दोन लेकरं टाकून दहा वर्षांपूर्वी पतीने दुसरे लग्न केले… मात्र ती खचली नाही. कष्टाने लेकरांच्या पालनपोषणाचा निर्णय तिने घेतला. मात्र नियतीला तेही मान्य नव्हते. ८ जुलैला कॅन्सरने या माऊलीचा मृत्यू झाला आणि तिची दोन्ही लेकरं अनाथ झाली. मात्र अशावेळी विवेकानंद आश्रम (ता. मेहकर) या बहीण-भावांचा सांभाळ करण्यासाठी सरसावले …
 

हिवरा आश्रम (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पदरात दोन लेकरं टाकून दहा वर्षांपूर्वी पतीने दुसरे लग्‍न केले… मात्र ती खचली नाही. कष्टाने लेकरांच्या पालनपोषणाचा निर्णय तिने घेतला. मात्र नियतीला तेही मान्य नव्हते. ८ जुलैला कॅन्‍सरने या माऊलीचा मृत्‍यू झाला आणि तिची दोन्‍ही लेकरं अनाथ झाली. मात्र अशावेळी विवेकानंद आश्रम (ता. मेहकर) या बहीण-भावांचा सांभाळ करण्यासाठी सरसावले आहे. यापुढे ही मुलं आश्रमाची म्‍हणून सांभाळली जातील, असे आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी सांगितले.

राम सोनुने व सौ. सीमा राम सोनुने हे कुटुंब विवेकानंद आश्रमात कामाला आले होते. मात्र दोघांत पटत नसल्याने राम पत्‍नी व चिमुकल्यांना सोडून दहा वर्षांपूर्वी निघून गेला. त्‍याने दुसरे लग्‍न केले. त्‍यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. आदित्‍य नववीत शिकतो तर गायत्री सहावीत शिकते. त्‍यांच्‍या पालनपोषणाची जबाबदारी माऊली सीमा आजवर कष्टाने करत होती. मात्र तिचा ८ जुलैला कॅन्सरने मृत्‍यू झाला. आदित्य आणि गायत्रीला सांभाळणारे जवळचे कोणतेच नातेवाइक तयार नसल्याने त्‍यांचा सांभाळ आश्रमानेच करण्याचा निर्णय घेतला.