अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा

हायकोर्टाच्या चौकशी आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ५ एप्रिलरोजी हायकोर्टाने पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआयमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या स्थितीत मी मंत्री(गृह)पदावर राहणे मला योग्य वाटत नाही.त्यामुळे मी स्वत: होऊन या पदापासून …
 

हायकोर्टाच्या चौकशी आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ५ एप्रिलरोजी हायकोर्टाने पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआयमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या स्थितीत मी मंत्री(गृह)पदावर राहणे मला योग्य वाटत नाही.त्यामुळे मी स्वत: होऊन या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
तत्पूर्वी सोमवारी सकाळी उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली.त्यात स्वतः होऊन राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.शरद पवार यांनीही त्याला संमती दिल्यानंतर देशमुख यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठविला.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेल्या १०० कोटींच्या खंडणीप्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून देशमुख यांची जोरदार पाठराखण करण्यात आली होती. प्रकरण गंभीर असल्याने त्यांचा राजीनामा घेतला जाईल, असे त्यावेळी वाटत होते. विरोधकांनंीही याप्रकरणावरून रान पेटवत देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु राष्ट्रवादीने त्यांचा राजीनामा तर घेतला नाहीच. उलट शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांनाही त्यांना पाठबळ व समर्थन द्यायला भाग पाडले. पण आता मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे. केवळ राष्ट्रवादी काँगेसच नव्हे तर शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांचीही यामुळे अडचण झाली आहे. देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचे मत सुप्रीम कोर्टानेही व्यक्त केले होते. आता उच्च न्यायालयाने देशमुख पदावर असताना पोलीस प्रकरणाचा तपास निष्पक्ष करू शकणार नाहीत, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे..