अनैतिक संबंध ठेवणाऱ्या १७ वर्षीय मुलानेच पाजले प्रेयसीसह तिच्‍या मुलांना विष!; टेंभीचे गौडबंगाल उलगडले!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः टेंभीचे (ता. मोताळा) गौडबंगाल अखेर उलगडले आहे. अल्पवयीन प्रियकरानेच ३० वर्षीय विवाहित प्रेयसीला आणि तिच्या मुलांना विष पाजल्यानंतर स्वतःही बदनामीच्या भीतीने विष पिले. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध दोघांच्या खुनाचा तर चिमुकल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चार जुलैच्या मध्यरात्री टेंभी येथील सौ. वृषाली समाधान तायडे (३०), अनुभव …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः टेंभीचे (ता. मोताळा) गौडबंगाल अखेर उलगडले आहे. अल्पवयीन प्रियकरानेच ३० वर्षीय विवाहित प्रेयसीला आणि तिच्‍या मुलांना विष पाजल्यानंतर स्वतःही बदनामीच्या भीतीने विष पिले. या प्रकरणी पोलिसांनी त्‍याच्‍याविरुद्ध दोघांच्‍या खुनाचा तर चिमुकल्याला जीवे मारण्याचा प्रयत्‍न केल्याचा गुन्‍हा दाखल केला आहे.

चार जुलैच्या मध्यरात्री टेंभी येथील सौ. वृषाली समाधान तायडे (३०), अनुभव समाधान तायडे (६) यांचा विष प्राशनाने मृत्यू झाला होता तर वैभव समाधान तायडे (११) आणि एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर मलकापूरला खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू हाेते. मृतक वृषालीचे गावातीलच या १७ वर्षीय अल्पवयीन मुलासोबतसहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. हा अल्पवयीन मुलगा गावातच शेती आणि क्रेन मशीनचे काम पाहतो. वहिनी वहिनी म्हणता म्हणता त्याचे वृषालीसोबत प्रेमसंबंध तयार झाले होते. ४ जुलैच्या रात्री तिचा पती समाधान आणि सासरे शेतात हरणापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी गेले होते. घरासमोर अंगणात खाट टाकून सासू झोपली होती. याच संधीचा फायदा घेत १७ वर्षीय अल्पवयीन प्रियकर त्यांच्या घरात घुसला. ही बाब अंगणात झोपलेल्या सासूच्या लक्षात आल्याने सासूने शेजारीच राहणारा पुतण्या युवराज तायडे याला बोलावून घेतले. ही बाब गावातील ज्‍येष्ठांच्‍या कानावर घालावी म्हणून युवराजने गावचे सरपंच आणि पोलीस पाटलांना बोलावून घेतले. दरवाजा तोडल्‍यानंतर चौघेही विषबाधित दिसले होते. रुग्‍णालयात नेताना वाटेतच वृषाली आणि तिच्‍या सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. वैभव समाधान तायडे (११) आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर उपचार सुरू होते.

या प्रकरणाच्‍या चौकशीत धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. अनैतिक संबंधामुळे अल्पवयीन मुलगा वृषालीच्या घरी गेला. मात्र तो घरात आल्यानंतर सासूच्‍या लक्षात आल्याने गावात गहजब माजला. आता आपले काही खरे नाही या भीतीपोटी तयाने वृषाली समाधान तायडे ,अनुभव ऊर्फ कुनाल समाधान तायडे यांना जबरदस्तीने विषारी आैषध पाजून ठार मारले. वैभव समाधान तायडे यास विष आैषध पाजून जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्‍यामुळे या अल्पवयीन मुलाविरुद्ध आणि खून आणि खुनाचा प्रयत्‍न असे गुन्‍हे दाखल झाले आहेत.