अपघातवार.. 3 ठार!; नांदुरा, खामगाव, बुलडाणा तालुक्‍यातील भीषण दुर्घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः जिल्ह्यात आज, 31 मे जणू अपघातवारच होता. तब्बल तीन मोठे अपघात होऊन तिघांचा बळी गेला, तर तिघे जखमी झाले. खामगाव, नांदुरा, बुलडाणा तालुक्यात हे अपघात घडल आहेत. नांदुऱ्यात ट्रेलरने उडवल्याने दुचाकीस्वार वृद्ध ठारनांदुरा (प्रविण तायडे) ः नांदुरा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खरेदी- विक्री संघाजवळ ट्रेलरने मागून धडक दिल्याने 65 …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः जिल्ह्यात आज, 31 मे जणू अपघातवारच होता. तब्‍बल तीन मोठे अपघात होऊन तिघांचा बळी गेला, तर तिघे जखमी झाले. खामगाव, नांदुरा, बुलडाणा तालुक्‍यात हे अपघात घडल आहेत.

नांदुऱ्यात ट्रेलरने उडवल्याने दुचाकीस्वार वृद्ध ठार
नांदुरा (प्रविण तायडे) ः
नांदुरा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खरेदी- विक्री संघाजवळ ट्रेलरने मागून धडक दिल्याने 65 वर्षीय मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, 31 मे रोजी दुपारी सव्वाबाराच्‍या सुमारास घडली. वडनेर भोलजी येथील निनाजी धोंडू कुयते (65) मोटरसायकलने खरेदी- विक्री संघाजवळून सेंट्रल बँकेकडे जात असताना मागून येणाऱ्या ट्रेलरने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटरसायकलला धडक दिली. यात निनाजी कुयते यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकार यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. यावेळी प्रवीण डवंगे, पवन चरखे, आनंद वावगे, सोनू चोपडे यांनी मदतकार्य केले. या अपघात प्रकरणी ट्रेलरचालक परमसिंह ज्ञानूसिंह रावत (28, रा. खेडादेवनारायण, जिल्हा अजमेर, राजस्थान) यास नांदुरा पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार पुलावरून कोसळून नांदुऱ्याचा कंत्राटदार ठार

नांदुरा (प्रवीण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नियंत्रण सुटून कार पुलावरून कोसळली. यात नांदुरा येथील शासकीय कंत्राटदार ठार झाला. ही घटना खामगाव- चिखली रोडवरील गणेशपूरनजीक आज, 31 मे रोजी दुपारी दीडच्‍या सुमारास घडली. सुभाष मोहता (59, रा. सहयोग कॉलनी, नांदुरा) असे ठार झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. चिखलीवरून खामगावकडे येत असताना गणेशपूरजवळ त्यांचे वाहन पुलावरून कोसळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालवत असलेला त्यांचा मुलगा श्रेयस (30) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्‍यावर खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खामगावजवळ दुचाकीस्‍वार ठार
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः
शेगाव पंचायत समितीत कार्यरत असलेले विश्वनाथ रामकृष्ण नेमाडे ( 43, रा. हिंगणा बैजनाथ, ता. शेगाव) हे दुचाकीने आज सकाळी साडेनऊच्‍या सुमारास शेगाववरून खामगावकडे कामानिमित्त येत होते. त्‍यांना जयपूर लांडे फाट्याजवळ दुभाजक संपते तिथे समोरून येणाऱ्या भरधाव कारने उडवले. यात नेमाडे यांचा जागीच मृत्‍यू झाला.

बुलडाण्याजवळीत अपघातात दोघे जखमी

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील चिखली रोडवरील हाजी मलंग दर्गाजवळ आज, 31 मे रोजी सायंकाळी 6 च्‍या ट्रकला छोट्या मालवाहू वाहनाने मागून धडक दिली. यात मालवाहू वाहनाच्‍या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले, तर त्‍यात बसलेले चालक भूषण खरे (26) व सोबत असलेला सूरज मांजरे (23, दोघे रा. सुंदरखेड, बुलडाणा) किरकोळ जखमी आले. ट्रकचालक मकसूद खान इस्माईल खान (51, रा. गौतमबुध्दनगर, उत्तरप्रदेश) हा केरळवरून पंजबाकडे चालला होता. चिखलीहून बुलडाण्याकडे येताना त्‍याला मालवाहू वाहनाने मागून धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.