अपयशावर झगमगाटाचा पडदा पडणार?; ग्रामपंचायत निवडणुकीत अल्प जागा येऊनही नक्की दाखवायचे काय, मतदारसंघात कुजबूज

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागावर वर्चस्व कुणाचे हा प्रश्न ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने समोर आला आहे. 80 टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचा भगवा फडकल्याने ग्रामीण मतदारांनी आमदार श्वेताताई महालेंना स्पष्ट कौल दिल्याचे दिसत असले तरी, ताईंशी स्पर्धेत आपण कमी पडतोय म्हणून भाऊंनी आज, 11 वाजता मतदारसंघातील ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार ठेवून हे अपयश झाकण्याचा …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागावर वर्चस्व कुणाचे हा प्रश्‍न ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने समोर आला आहे. 80 टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचा भगवा फडकल्याने ग्रामीण मतदारांनी आमदार श्‍वेताताई महालेंना स्पष्ट कौल दिल्याचे दिसत असले तरी, ताईंशी स्पर्धेत आपण कमी पडतोय म्हणून भाऊंनी आज, 11 वाजता मतदारसंघातील ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार ठेवून हे अपयश झाकण्याचा तोकडा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
काँग्रेसला समर्थन करणार्‍या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा 23 जानेवारीला पावणेबाराच्या सुमारास चिखली येथील मौनीबाबा संस्थानमध्ये होणार आहे. सोहळ्याला जिल्ह्याच्या संपर्कमंत्री तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आमदार राजेश एकडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मनिषाताई पवार यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हळूहळू मतदारसंघावरील भाऊंची पकड ढिली होत चालल्याचे वारंवार दिसून आले आहे. खरीप हंगामात शेतकर्‍यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचले असताना भाऊंना पाहणी करण्यासही सवड मिळाली नव्हती. दुसरीकडे आमदार श्‍वेताताई महाले चिखल तुडवत शेतात जात होत्या. शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर श्‍वेताताईंनी घेतलेली आक्रमक भूमिकाही त्यांची लोकप्रियता वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे. याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील 80 टक्के ग्रामपंचायतींवर भाजप विचारसरणीचे सदस्य निवडून आले. एकूण 75 ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या निवडणुकीत जवळपास 46 ग्रामपंचायतींवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व राहिले. 20 ग्रामपंचायतींवर मित्र पक्ष व सदस्यांच्या सहकार्याने 65 ठिकाणी भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे चित्र आहे. ही नामुष्की झाकण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्याचा थाटमाट दाखवला जात असल्याची चर्चा सुरू आहे. सत्कार सोहळ्याची जंगी तयारी केली खरी, पण या तयारीच्या झगमगाटात अपयश झाकले जात असल्याची टीका काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांतून केली जात आहे. मतदारसंघातील अर्ध्या जरी ग्रामपंचायती जिंकल्या असत्या तरी सोहळ्याचा झगमगाट शोभला असता, अशीही कुजबूज सुरू आहे.