अबब… मास्‍क घातला नाही म्‍हणून 30 लाखांचा दंड!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काहीही झाले तरी मास्क घालणार नाही, असा हट्टीपणा करत सार्वजनिक स्थळी मोकाट फिरणाऱ्या जिल्ह्यातील हजारो बेजबाबदार नागरिकांना हा मूर्खपणा भलताच महागात पडला! यापोटी त्यांना 30 लाखांहून अधिकचा दंड भरावा लागला. तसेच कोरोनाविषयक निर्देशांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांविरुद्धही यंत्रणांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला. यामुळे गत् सव्वा महिन्यातील या …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काहीही झाले तरी मास्क घालणार नाही, असा हट्टीपणा करत सार्वजनिक स्थळी मोकाट फिरणाऱ्या जिल्ह्यातील हजारो बेजबाबदार नागरिकांना हा मूर्खपणा भलताच महागात पडला! यापोटी त्यांना 30 लाखांहून अधिकचा दंड भरावा लागला. तसेच  कोरोनाविषयक निर्देशांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांविरुद्धही यंत्रणांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला. यामुळे गत्‌ सव्वा महिन्यातील  या व अन्य कारवाईत मिळून तब्बल 41 लाखांवर दंडाची वसुली करण्यात आली.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढल्याने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नमुने संकलन, चाचण्यांचा व लसीकरणाचा वेग वाढविणे यावर भर देण्यात येत आहे. याशिवाय सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी व संध्याकाळी 6 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी, मर्यादित समारंभ आदी निर्देशासह  व्यावसायिकांना नियम  घालून देण्यात आले आहेत. तसेच मास्क न घालणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र या निर्देशांचे  अनेक दुकानदार, व्यावसायिक व नागरिक उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. यामुळे अशा आस्थापना व नागरिकांविरुद्ध  कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तहसील कार्यालय,  स्थानिक स्वराज्य संस्था पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करीत आहेत. मागील 20 फेब्रुवारी ते 29 मार्च 2021 दरम्यान यंत्रणांनी जिमखाना, क्लब, हॉटेल्स, मॉल्‍स, मंगल कार्यालये, उपहारगृहे, सिनेमागृह ते उद्यान, सार्वजनिक स्थळापर्यंत कारवाईचा विस्तार वाढवला. या जेमतेम 37 दिवसांच्या कालावधीत मास्क न घालणाऱ्यांना तब्बल 30 लाख 66 हजार 640 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय! याशिवाय विविध आस्थापनांना 10 लाख 43 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सर्व मिळून सव्वा महिन्याच्या कालावधीत 41 लाख 29 हजार रुपये इतक्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.