अबब… ८ लाख १५ हजारांचा किराणा कुटुंबाला दिला उधारीवर!; शेगावमधील प्रकार

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिनाभर किराणा उधारीवर घेऊन नंतर बिल अनेक जण देतात. ही परंपरा अनेक दुकानदार आणि कुटुंबात असते. पण हे करताना फार फार तर तीन महिने उधारीवर कोणताही किराणा दुकानदार देईल. पण शेगावमध्ये अत्यंत आश्चर्यस्पद प्रकार समोर आला आहे. तब्बल ८ लाख १५ हजार ४७३ रुपयांचा किराणा एका कुटुंबाला उधार देण्यात आला. …
 
अबब… ८ लाख १५ हजारांचा किराणा कुटुंबाला दिला उधारीवर!; शेगावमधील प्रकार

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिनाभर किराणा उधारीवर घेऊन नंतर बिल अनेक जण देतात. ही परंपरा अनेक दुकानदार आणि कुटुंबात असते. पण हे करताना फार फार तर तीन महिने उधारीवर कोणताही किराणा दुकानदार देईल. पण शेगावमध्ये अत्‍यंत आश्चर्यस्पद प्रकार समोर आला आहे. तब्‍बल ८ लाख १५ हजार ४७३ रुपयांचा किराणा एका कुटुंबाला उधार देण्यात आला. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे असा हा प्रकार… पण घेता घेता बिल चुकतेही करावे लागते, हे कदाचित या कुटुंबाला ज्ञात नसावे. त्‍यामुळे एवढी मोठी रक्‍कम थकल्यानंतर या कुटुंबाने आधी हात वर केले. त्‍यानंतर दुकानदाराने वारंवार मागणी केल्याने खोटे धनादेश दिले. हे धनादेश काही वटलेच नाही. मग दुकानदारालाच जीवे मारण्याच्‍या धमक्या दिल्या. शेगाव शहर पोलिसांनी या “फुकटखाऊ’ कुटुंबाविरुद्ध गुन्‍हा दाखल केल आहे.

श्रीपाद सुरेश गणोरकार (४०) यांचे शेगावमधील सावता चौकातील जुने महादेव मंदिराजवळ किराणा दुकान आहे. याच ठिकाणी ते राहतातही. देवकृष्णा वासुदेव तिरुख (४०) व सौ. विजया देवकृष्णा तिरुख (रा. मुन्सिपल शाळेसमोर, भूत बंगला शेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्‍यांनी गणोरकार यांच्‍या दुकानातून वेळोवेळी किराणा सामान उधारीवर घेतले. मात्र त्‍याचे पैसे आज देऊ उद्या देऊ करत दिलेच नाहीत. हा प्रकार १६ नोव्‍हेंबर २०१९ पासून २४ जानेवारी २०२१ पर्यंत घडत होता. वारंवार पैशांचा तगादा लावल्यानंतर या तिरुख दाम्‍पत्‍याने त्‍यांना धनादेश दिले होते. मात्र हे धनादेश खोटे निघाले. त्‍यानंतर पैसे मागितले असता या दाम्‍पत्‍याने गणोरकार यांना शिविगाळ केली. जीवे मारण्याच्‍या धमक्या दिल्या. या प्रकरणात शेगाव शहर पोलिसांनी न्यायालयाच्‍या आदेशाने गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक श्रीकृष्णा डांगे करत आहेत.