अरेच्‍चा, शिवशंकरभाऊ तर लबाड निघाले! “मिटवामिटवी’तून झाले होते प्रामाणिक, पण पोलिसांनी सत्‍य समोर आणलेच!; ८,००,०००/- घालायचे होते त्‍यांना घशात!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २७ जुलैला दुपारी साडेतीनच्या सुमारास असलम खान अमनुल्ला खान यांची आठ लाख रुपये असलेली बॅग आठवडी बाजारात पडली होती. ती एस.टी. महामंडळाचे मॅकेनिक शिवशंकर आदे यांना सापडली. त्यांनी ती प्रामाणिकपणे पोलीस ठाण्यात आणून दिली, अशी “स्टोरी’ खुद्द ज्यांचे पैसे पडले होते त्यांनी व त्यांच्या नातेवाइकांनी रचली होती. मात्र ही स्टोरी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २७ जुलैला दुपारी साडेतीनच्या सुमारास असलम खान अमनुल्ला खान यांची आठ लाख रुपये असलेली बॅग आठवडी बाजारात पडली होती. ती एस.टी. महामंडळाचे मॅकेनिक शिवशंकर आदे यांना सापडली. त्‍यांनी ती प्रामाणिकपणे पोलीस ठाण्यात आणून दिली, अशी “स्टोरी’ खुद्द ज्यांचे पैसे पडले होते त्यांनी व त्यांच्या नातेवाइकांनी रचली होती. मात्र ही स्‍टोरी तद्दन खोटी निघाली. पोलिसांनी या प्रकरणाचे सत्‍य बाहेर आणले. पोलिसांत जमा झालेली रक्कम कोर्टाची पायरी न चढता त्वरित मिळावी म्‍हणूनच बॅग उचलणाऱ्यावर कारवाई होऊ नये, अशी भूमिका खान आणि त्‍यांच्‍या नातेवाइकांनी घेतली होती. आहे. मात्र शहर पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर देत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि शिवशंकरभाऊंचा लबाडपणाही समोर आला.

नेमके काय घडलं…
२७ जुलैला शहर पोलीस स्टेशनचे बहुतांश कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या रंगीत तालमीसाठी चिखली रोडवरील पैनगंगा नदीकिनारी जाण्याची तयारी करत होते. त्याचवेळी सायंकाळी देऊळघाटचे जिल्हा परिषद शिक्षक असलम खान अमनुल्ला खान पोलीस ठाण्यात आले. त्यांनी त्यांची आठ लाख रुपये असलेली बॅग आठवडी बाजारात पडली व कुणीतरी उचलून नेल्याची तक्रार केली. तेव्‍हा शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक श्री. काळे यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये घटना कैद झाली होती. त्या आधारे बॅग उचलणारा व्यक्ती हा एस.टी. महामंडळाचा कर्मचारी असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर एस महामंडळाच्या आगारात जाऊन कर्मचाऱ्याचा फोटो दाखवून त्याचे नाव, गाव व पत्ता विचारण्यात आला. तो बॅग उचलून नेणारा शिवशंकर आदे असल्याचे समोर आले. त्‍यामुळे त्‍याच्या घरी जाऊन पोलिसांनी चौकशी केली.

सुरुवातीला त्‍याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बॅग घरी आणल्याची कबुली दिली. बॅगेतील पैसे घेऊन पोलिसांसोबत पोलीस ठाण्यात दाखल झाला. रक्कम मोजली असता त्यातील अर्धी रक्कम गायब असल्याचे लक्षात आले. तेव्हा आदे याने एवढीच रक्कम होती, असे सांगितले. पोलिसांनी पुन्हा आदे याच्या घरी जाऊन तपासणी केली असता त्याने शेवायाच्या डब्यात शेवायांच्या बुडाशी पैसे ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी पूर्ण रक्कम जप्त करून पोलीस ठाण्यात आणली. सुरुवातीला या प्रकरणात अज्ञात व्यक्‍तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासात लगेच शिवशंकर आदे याने चोरीच्या उद्देशानेच रक्कम घरात दडवून ठेवल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसांनी केलेल्या वेगवान तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.