अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्‍महत्‍या, शेगावमध्ये तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

चांडोळ (प्रमोद गायकवाड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चांडोळ (ता. बुलडाणा) येथील ४८ वर्षीय व्यक्तीने आपल्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, १६ जुलैला सकाळी समोर आली. सुरेश लक्ष्मण सोनुने असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सकाळी शेतात जातो म्हणून ते घरातून गेले. त्यांनी शेतात गेल्यानंतर एका कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेतला. …
 

चांडोळ (प्रमोद गायकवाड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चांडोळ (ता. बुलडाणा) येथील ४८ वर्षीय व्‍यक्‍तीने आपल्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, १६ जुलैला सकाळी समोर आली.

सुरेश लक्ष्मण सोनुने असे आत्‍महत्‍या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सकाळी शेतात जातो म्हणून ते घरातून गेले. त्यांनी शेतात गेल्यानंतर एका कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेतला. ते बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने घरच्यांनी त्‍यांचा शोध घेतला असता त्‍यांनी आत्‍महत्‍या केल्याचे समोर आले. त्‍यांच्‍या नावावर सव्वा दोन एकर शेती असून, कर्जही त्‍यांनी घेतलेले असल्याचे समजते. त्‍यांच्या पश्चात पत्‍नी, दोन भाऊ, तीन विवाहित मुली, एक अविवाहित मुलगा असा परिवार आहे. त्‍यांचा मुलगा औरंगाबादमध्ये कामानिमित्त राहतो. पती-पत्‍नीच गावात राहत होते. धाड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

शेगाव तालुक्‍यात तरुणाने घेतला गळफास
शेगाव तालुक्‍यातील वरखेड बुद्रूक शिवारात २४ वर्षीय तरुणाने मद्यधुंद अवस्‍थेत गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना १५ जुलैला सायंकाळी साडेसातच्‍या सुमारास घडली. गणेश अंबादास गावंडे (रा. वरखेड बुद्रूक) असे आत्‍महत्‍या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्‍याने गजानन गावंडे यांच्‍या शेतातील निंबाच्‍या झाडाला दोरीने गळफास घेतला. मृतकाचा भाऊ संतोष गावंडे यांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठवला.