अवैध रेती उत्‍खननाने घेतला युवकाचा बळी, दोघे जखमी; नदीतून रेती काढताना कपार कोसळली; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पूर्णा नदीच्या पात्रातील कपार अंगावर पडून एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले आहेत. ही घटना संग्रामपूर तालुक्यातील टाकळी पंच शिवारात आज, 15 मे रोजी सकाळी समोर आली. टाकळी पंच गावाजवळील पूर्णा नदी व बाजूलाच वान नदीतून अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक राजरोस सुरू असून, रात्रंदिवस उपसा सुरू …
 

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पूर्णा नदीच्‍या पात्रातील कपार अंगावर पडून एकाचा मृत्‍यू तर दोघे जखमी झाले आहेत. ही घटना संग्रामपूर तालुक्‍यातील टाकळी पंच शिवारात आज, 15 मे रोजी सकाळी समोर आली.

टाकळी पंच गावाजवळील पूर्णा नदी व बाजूलाच वान नदीतून अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक राजरोस सुरू असून, रात्रंदिवस उपसा सुरू आहे. नदीपात्रात पाणी असल्याने पात्रातच ठिकठिकाणी 10 ते 15 फूट खोल कपारी खोदण्यात आल्या आहेत. आज सकाळी  10 ते 15 फूट खोल असलेल्या कपारीतून काही मजूर रेती काढत होते. रेती काढत असताना ती कपार ढिसाळ झाल्‍याने कोसळली. यात संजय श्रीराम वानखडे (35, रा. माळेगाव बाजार) यांचा गुदमरून मृत्यू झाला. त्‍याला पातुर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. याच घटनेत महादेव वासुदेव म्हसाळ (29 रा. माळेगाव बाजार) याच्या पायाला जबर मार लागलेला असून, तो शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहे, तर मोहन रामदास वानखेडे (25, रा. माळेगाव बाजार) हा किरकोळ जखमी झाला आहे. याच कपारीत आणखीही 4-5 मजूर रेती काढत होते, मात्र ते बाहेर असल्याने बचावले. यावेळी याच परिसरात आणखी 3-4 ठिकाणी अशाप्रकारेच उत्‍खनन सुरू असल्याची चर्चा ऐकावयास आली.

मोठ्या महसुलावर पाणी…

पूर्णा आणि वान नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्‍खनन सुरू असले तरी स्‍थानिक महसूल अधिकाऱ्यांकडे याकडे दूर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्‍थांनी केला आहे. मंडळ अधिकाऱ्याच्‍या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू असल्याची चर्चा यावेळी होती. तहसीलदारांचेही याकडे दूर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्‍थांनी केला.