अवैध रेती उपशावर ‘इलाज’; नदीलगत जाणारे रस्‍तेच जेसीबीने ठेवले खोदून!; सिंदखेड राजा तालुक्‍यात तहसीलदारांचा अनोखा उपाय

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीतून अवैधरित्या रेती उपसा सर्रास सुरू असल्याने तहसीलदारांनी त्याला आळा घालण्यासाठी नदीलगत जाणारे रस्तेच जेसीबीने खोदून ठेवले. ज्यांच्या शेतातून अवैध रेती वाहतूक केली जात होता, त्यांनाही सुनावले. या मोहिमेदरम्यान एक ट्रॅक्टर व चार ब्रास रेती भरलेल्या एक टिप्पर पकडण्यात आले. ही कारवाई …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्‍यातील खडकपूर्णा नदीतून अवैधरित्या रेती उपसा सर्रास सुरू असल्याने तहसीलदारांनी त्‍याला आळा घालण्यासाठी नदीलगत जाणारे रस्‍तेच जेसीबीने खोदून ठेवले. ज्‍यांच्‍या शेतातून अवैध रेती वाहतूक केली जात होता, त्‍यांनाही सुनावले. या मोहिमेदरम्यान एक ट्रॅक्‍टर व चार ब्रास रेती भरलेल्‍या एक टिप्पर पकडण्यात आले. ही कारवाई आज, 29 मे रोजी करण्यात आली.
लिलाव न झालेले घाट जणू रेतीमाफियांच्‍याच मालकीचे झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीउपसा सुरू असून, ट्रॅक्‍टर-टिप्परमधून रेती वाहतूक केली जाते. याबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय तहसीलदार सुनील सावंत यांनी घेतला. नायब तहसीलदार प्रविण लटके, तलाठी राहूल देशमुख यांच्‍या मदतीने घाटालगत जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून घाट बंद केले. लिंगा, पिंपळगाव कुडा, दुसरबीड, ताडशिवणी, राहेरी, हिवरखेड शिवारातील रेतीघाट अशापद्धतीने बंद करण्यात आले. ज्यांच्या शेतामधून अशा प्रकारे रेती वाहतूक सुरू होती, त्यांनाही सुनावले. याबाबत तहसीलदार श्री. सावंत यांच्‍याशी संपर्क साधला असता त्‍यांनी अवैध रेतीउपसा सुरू असल्यास नागरिकांनी माहिती द्यावी. लगेच कारवाई केली जाईल, असे आवाहन केले.